
तवांग मठातून मॉडर्न शिक्षण प्रदान
अक्षता पवार ः सकाळ वृत्तसेवा
तवांग (अरुणाचल प्रदेश), ता. १९ : तवांग येथील पवित्रस्थळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘तवांग मॉनेस्ट्री’ (मठ) येथे बौद्ध शिक्षणाबरोबरच मुलांना मॉडर्न एज्युकेशन देण्यावर भर दिला जात आहे. त्यामुळे भविष्यात या मुलांना मुख्य प्रवाहात येणे सोपे होऊन जाते.
तवांग येथे ज्यांच्या घरात तीन किंवा त्यापेक्षा जास्त मुले आहेत अशा घरातील दुसऱ्या मुलाला या मठात लामा म्हणून प्रवेश दिला जातो. याबाबत मठातील संगेलेता लामा यांनी सांगितले की, ‘‘लामा प्रशिक्षण घेताना सर्व मुलांना बौद्ध धर्माचा इतिहास, त्याचे महत्त्व, समाजासाठी होणारा उपयोग अशा अनेक गोष्टी शिकवल्या जातात. १९७० पर्यंत केवळ बौद्ध धर्मविषयक शिक्षण दिले जात होते. तसेच बोधी किंवा तिब्बत भाषेचा वापर केला जात होता. मात्र त्यानंतर मॉडर्न एज्युकेशनच्या शिक्षणाची सुरवात झाली. आता येथे मुलांना आठवीपर्यंतचे शिक्षण दिले जाते. त्यामध्ये गणित, इंग्रजी, हिंदी, सामाजिक विज्ञान, संस्कृत आदींचा समावेश आहे. केवळ बौद्ध धर्माचा अभ्यास ज्यांना करायची इच्छा असते, ते आठवीनंतर या मठातच बौद्ध धर्माचे शिक्षण सुरू ठेवतात. तर काही जण इतर विषयातील पुढील शिक्षणासाठी, पीएच.डी. किंवा संशोधनासाठी हिमाचल प्रदेश येथील धर्मशाळा किंवा वाराणसी येथील विद्यापीठात प्रवेश घेतात.’’
तवांग मठाबाबत....
या मठाची स्थापना १६८१ मध्ये मेरेक लामा लोद्रे ग्यात्सो यांनी केली होती. त्यावेळचे पाचवे दलाई लामा यांच्या आशीर्वादाने या मठाची उभारणी केली होती. त्यावेळी तवांग तिब्बतचे एक भाग होते. येथील धर्मगुरूंना लामा असे म्हणले जाते. अनेक लोकांना बौद्ध धर्माबाबत माहिती नसल्याने लोकांपर्यंत या धर्माची माहिती पोचविण्याच्या अनुषंगाने हा मठ साकारला होता. तसेच मठात धर्मगुरू उपलब्ध व्हावे यासाठी पूर्वी तवांगच्या प्रत्येक घरातील दुसरा मुलगा हा लामा म्हणून या मठात दाखल होत होता. ही परंपरा अद्याप काही प्रमाणात सुरू आहे. बौद्ध धर्माचे सर्व शिक्षण त्यांना दिले जाते. हे तवांग येथील महत्वाच्या स्थळांपैकी एक मानले जाते.
१५ व्या दलाई लामांबाबत मौन....
तवांग परिसरात अनेक मठ आहेत. येथे महिला आणि पुरुष असे दोन्ही लामा बौद्ध धर्माचे पालन करत लोकांपर्यंत या धर्माचा प्रसार करत आहेत. अशाच काही लामांशी भविष्यातील १५ व्या दलाई लामा यांच्याबाबत चर्चा करण्यात आली. १४ व्या दलाई लामा यांच्यानंतर नव्या दलाई लामा यांची निवड कशी होणार? किंवा नवीन दलाई लामा कोण असतील असे विचारल्यास, प्रत्येकाने मौन राहणे योग्य समजले. तसेच आताचे दलाई लामा हे वयाच्या १०३ वर्षांपर्यंत आपला कार्यकाळ सांभाळतील आणि त्यानंतर १५ व्या दलाई
लामा यांच्याबाबत विचार केला जाईल, असे विविध मठातील लामा यांनी सांगितले.
मठाचे वैशिष्टय...
- हे मठ तीन मजली आहेत.
- मठ परिसरात ६५ निवासी इमारती आहेत.
- वाचनालयामध्ये जुने धर्मग्रंथ आहेत.
- मठाशेजारी संग्रहालय, या संग्रहालयाचा वापर बौद्ध धर्माचा अभ्यास आणि संशोधनासाठी उपयुक्त.
- लामा प्रशिक्षणासाठी प्रवेश घेतलेल्या लहान मुलांना शिक्षण दिले जाते.
Web Title: Todays Latest Marathi News Pne22m81622 Txt Pune Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..