
बिहारकडे जाणाऱ्या रेल्वे रद्द
पुणे, ता. १९ ः सैन्य भरतीच्या ‘अग्निपथ’ योजनेला बिहार व अन्य राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात विरोध सुरु आहे. आंदोलनकर्त्यांनी रेल्वेचे मोठे नुकसान केले. त्या पार्श्वभूमीवर पुणे रेल्वे प्रशासनानेही खबरदारी घेतली आहे. बिहारकडे जाणाऱ्या रेल्वे रद्द केल्या आहेत. तसेच आरपीएफ, जीआरपी व ७० ते ८० शहर पोलिसांचा बंदोबस्त पुणे स्थानकावर ठेवला आहे. पुणे आरपीएफने सर्व जवानांच्या सुट्या रद्द करून त्यांना कामांवर बोलावून घेतले आहे.
बिहारमध्ये झालेल्या आंदोलनात केवळ दानापूर रेल्वे विभागाचे सुमारे ५०० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज रेल्वे प्रशासनाने वर्तविला आहे. पुण्याहून सुटणाऱ्या दोन रेल्वे रद्द झाल्या आहेत. यात पुणे-दानापूर व पुणे-एर्नाकुलम यांचा समावेश आहे. पुणे-दानापूर रेल्वे रद्द झाल्याने पुणे विभागाला सुमारे दोन लाख रुपये प्रवाशांना परत द्यावे लागले आहे. पुणे स्थानकावरील आरक्षण केंद्रात २५० प्रवाशांनी तिकीट रद्द केले. त्या बदल्यात त्यांना तिकिटाची पूर्ण रक्कम देण्यात आली. दरम्यान सिकंदराबाद, हैदराबाद येथून येणाऱ्या गाड्यांना पाच ते सहा तासांचा उशीर होत आहे.
अनुचित प्रकार होऊ नये म्हणून....
पुणे रेल्वे स्थानकांवर बिहार येथील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून बंदोबस्तात वाढ केली आहे. याशिवाय, आरपीएफची गुप्तचर यंत्रणाही कामाला लागली आहे. रेल्वे गाड्या, यार्डमध्येही गस्त घालण्यात येत आहे. तसेच श्वान पथकांद्वारे बॅगची पाहणी केली जात आहे.
सुरक्षेच्या कारणास्तव पुणे स्थानकांवर बंदोबस्त वाढविला आहे. तसेच, काही रेल्वे गाड्या रद्द तर काहींचा मार्ग बदलण्यात आला आहे. प्रवाशांनी अफवांवर विश्वास ठेवू नये.
- मनोज झंवर,
जनसंपर्क अधिकारी, रेल्वे विभाग, पुणे
Web Title: Todays Latest Marathi News Pne22m81677 Txt Pune Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..