
मुलांना भेटण्यासाठी बाबांची दमछाक; ताटातूट झालेल्या पालकांची खंत
पुणे - मुलाला भेटण्याची एवढी घार्इ आहे का?, त्याला बर वाटत नाहीये, भेटण्याचे ठिकाण आज बंद आहे, आधी पोटगी भरा, मग मुलांची भेट... अशी एक ना अनेक कारणे देवून आजही अनेक पालकांना त्यांच्या मुलांना भेटण्यापासून रोखण्यात येत आहे. त्यामुळे मुलांची भेटच होत नसल्याची खंत कौटुंबिक वादातून ताटातूट झालेल्या व मुलांचा ताबा नसलेल्या पालकांनी व्यक्त केली.
आंतरराष्ट्रीय ‘फादर्स डे’ नुकताच साजरा करण्यात आला. या दिवसाच्या निमित्ताने वडील आणि मुलांनी मिळून सेलिब्रेशन केले. मात्र अनेक वडील असेही आहेत की, ज्यांची त्यांच्या मुलांशी अनेक दिवसांपासून भेट झालेली नाही. न्यायालयाचा आदेश होवूनही त्याची पुर्तता न झाल्याने या पालकांना खासकरून वडिलांना पुन्हा न्यायालयीन लढा द्यावा लागत आहे. भेट होत नसलेल्या पालकांना मुलांशी कनेक्ट होता यावे. तसेच त्यांच्यातील संबंध अधिक चांगले होत अशा पालकांना न्यायालयीन मदत करण्यासाठी सेव्ह इंडियन फॅमिली फाउंडेशन (एसआयएफएफ) कार्यरत आहे. फाउंडेशनमध्ये कार्यरत असलेले आणि मुलांची भेट दुरापास्त झालेले रोहन (नाव बदललेले) यांनी सांगितले की, आई आणि वडील हे एका नाण्याच्या दोन बाजू आहेत. मुलांना आयुष्यात यशस्वी करण्यात दोघेही आवश्यक आहेत. त्यामुळे मुलांना आणि त्यांच्या वडिलांना एकमेकांपासून विभक्त करणे म्हणजे एकप्रकारची क्रूरताच आहे. मी माझ्या मुलापासून कौटुंबिक वादामुळे तीन वर्षांपासून दुरावलो आहे. न्यायालयाने दिलेल्या आदेशाप्रमाणे मुलांची भेट व्हावी, यासाठी अडचणींचा सामना करावा लागतो आहे.’
एकतर्फी आदेश नसल्याचा गैरफायदा
कोरोनामुळे कोणत्याही प्रकरणात एकतर्फी आदेश देऊ नका, असे निर्देश उच्च न्यायालयाने सर्व न्यायालयांना दिले होते. त्यामुळे विविध प्रकारच्या आदेशांसाठी अर्ज केला तर त्यात विरोधी पक्षकार हजरच राहत नव्हते. तर दोन्ही पक्षकार हजर नसल्यास न्यायालय आदेश करीत नव्हते. त्याचा गैरफायदा घेत पक्षकार हजरच राहिले नाहीत. त्यामुळे अनेक पालकांना त्यांच्या मुलांना भेटता आले नसल्याचे फाउंडेशनने सांगितले.
मुलांचा ताबा हे दुधारी शस्त्र न्यायालयात नवरा व बायको हे दोघेही आपापल्या सोयीप्रमाणे वापरताना दिसतात. अनेकदा असे दिसून येते की, ज्या पालकाकडे मुलांचा ताबा आहे, तो दुसऱ्याबाबत मुलांच्या मनात राग, घृणा तिरस्कार निर्माण करतात. या सगळ्याचा परिणाम मुलांच्या मानसिकतेवर झालेला दिसून येतो. मुलांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने ताबा कुणाकडे द्यायचा, याबाबत सर्वोच्च न्यायालयाने वारंवार आदेश दिले आहेत.
- ॲड. जान्हवी भोसले
Web Title: Todays Latest Marathi News Pne22m81967 Txt Pune Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..