
आक्षेपार्ह ट्विट केल्याप्रकरणी तरुणाचा जामीन फेटाळला
पुणे, ता. २० : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविषयी आक्षेपार्ह ट्विट केल्याप्रकरणी एकाचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी श्रद्धा डोलारे यांनी हा आदेश दिला.
निखिल श्यामराव भामरे (वय २२, रा. पिंगळवाडे, नाशिक) याचा जामीन फेटाळण्यात आला. भामरे याने ‘बागलाणकर’ या ट्विटर हँडलवरून पवार यांच्याविषयी आक्षेपार्ह ट्विट केले होते. त्यामुळे भामरेविरोधात दोन समूहात तेढ निर्माण केल्याप्रकरणी पुणे सायबर पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी फिर्याद दिली होती. या प्रकरणात भामरे याने जामिनासाठी अर्ज केला होता. सहायक सरकारी वकील विजयसिंह जाधव यांनी या अर्जास विरोध केला. आरोपीने केलेला गुन्हा गंभीर स्वरूपाचा असून, त्याने लिहिलेला आक्षेपार्ह मजकूर समाजमाध्यमात व्हायरल होत आहे. त्यामुळे दोन वर्गात तेढ निर्माण होऊन सामाजिक शांततेला बाधा येण्याची शक्यता आहे. त्यामुळे आरोपीचा जामीन अर्ज फेटाळण्यात यावा, असा युक्तिवाद ॲड. जाधव यांनी केला. न्यायालयाने तो मान्य केला.
Web Title: Todays Latest Marathi News Pne22m82072 Txt Pune Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..