राज्यात बी.ए.४ व्हेरियंटचे सहा रुग्ण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राज्यात बी.ए.४ व्हेरियंटचे सहा रुग्ण
राज्यात बी.ए.४ व्हेरियंटचे सहा रुग्ण

राज्यात बी.ए.४ व्हेरियंटचे सहा रुग्ण

sakal_logo
By

पुणे, ता. २२ : कोरोनाच्या ओमिक्रॉन या व्हेरियंटचा उपप्रकार असलेल्या ‘बी.ए.४’ या विषाणूंचा संसर्ग झालेले सहा रुग्ण राज्यात आढळले आहेत. त्यापैकी पाच रुग्ण पुण्यातील आहेत, तर उर्वरित एक नागपूरमधील असल्याची माहिती राज्याच्या सार्वजनिक आरोग्य खात्यातर्फे देण्यात आली. या सर्व रुग्णांना सहा ते १२ जून दरम्यान कोरोनाची लागण झाली होती, असेही खात्यातर्फे स्पष्ट करण्यात आले.

राज्यात आढळलेल्या कोरोनाबाधीत रुग्णांचे काही नमुने जनुकीय क्रमनिर्धारणासाठी (जिनोम सिक्वेंसिंग) पाठविण्यात येतात. पुण्यातील बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय आणि नागपूर येथील ‘भारतीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था’ (निरी) यांनी केलेल्या जनुकीय क्रमनिर्धारणातून ही माहिती पुढे आली आहे.
‘बी.ए.४’या उपप्रकारच्या विषाणूंचा संसर्ग झालेल्या सहापैकी पाच जणांचे पूर्ण लसीकरण झाले आहे. त्यामुळे त्यांच्यामध्ये संसर्गानंतर गुंतागुंत झाली नाही. यापैकी कोणालाही उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्याची गरज निर्माण झाली नाही. हे सर्व रुग्ण घरामध्येच योग्य उपचार घेऊन बरे झाल्याचे खात्यातर्फे सांगण्यात आले.
या सहा रुग्णांमध्ये पाच महिला असून एक पुरुष आहे. यापैकी तीन रुग्णांचे वय २० ते ३५ वर्षे वयोगटातील तर उर्वरित तिघांचे वय ५० वर्षांपेक्षा जास्त आहे.
राज्यात ओमिक्रॉनच्या ‘बी.ए.४’ आणि ‘बी.ए.५’ या उपप्रकारातील विषाणूंचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या २५ झाली आहे. त्यात सर्वाधिक रुग्ण हे पुणे जिल्ह्यातील आहेत. त्यांची संख्या १५ असून, त्या खालोखाल मुंबईमध्ये पाच, नागपूर येथे तीन आणि ठाण्यात दोन रुग्णांचे निदान झाले असल्याची माहिती आरोग्य खात्याने दिली.
राज्यात ‘बी.ए.४’ आणि ‘बी.ए.५’ पेक्षा ‘बी.ए.२’चे रुग्ण सर्रास आढळत आहेत. ताप, सर्दी, खोकला अशी सामान्य लक्षणे असलेले हे सर्व रुग्ण आहेत. लवकर निदान, योग्य उपचार आणि पुरेशी विश्रांती या माध्यमातून हे रुग्ण पाच ते सहा दिवसांमध्ये बरे होतात, अशी माहिती वैद्यकीय तज्ज्ञांनी दिली.

राज्यात तीन हजार २६० नवीन रुग्ण
राज्यात बुधवारी तीन हजार २६० कोरोनाच्या नवीन रुग्णांची नोंद झाली. राज्यात ९ मार्च २०२० पासून आतापर्यंत ७९ लाख ४५ हजार २२ रुग्णांना कोरोनाचा संसर्ग झाला. आजपर्यंत राज्यात आठ कोटी १६ लाख ९१ हजार ७७१ प्रयोगशाळा तपासण्या करण्यात आल्या. त्यामुळे राज्यातील ९.७३ टक्के रुग्णांना कोरोनाचे निदान झाले आहे.

राज्यात कोरोना मृत्यूदर १.८६ टक्के
राज्यात आज तीन कोरोनाबाधीत रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यात आतापर्यंत एक लाख ४७ हजार ८९२ रुग्ण मृत्युमुखी पडले
आहेत. मृत्यूचा हा दर १.८६ टक्के आहे.

राज्यात ९७.८३ टक्के रुग्ण बरे
राज्यात आतापर्यंत ७७ लाख ७२ हजार ४९१ कोरोनाबाधीत रुग्ण खडखडीत बरे झाले आहेत. त्यामुळे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.८३ टक्के असल्याची माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने दिली.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22m82796 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top