
जात पडताळणीसाठी विद्यार्थ्यांची वणवण
पुणे : महाऑनलाईनच्या पोर्टलला तांत्रिक अडचण असल्याने जात पडताळणीसह विविध दाखल्यांसाठी ऑनलाइन अर्ज भरता येत नाहीत. यासंदर्भात पुढील महिन्यात दहा तारखेनंतर या, असे महा-ई-सेवा केंद्र आणि सेतू केंद्रातून विद्यार्थ्यांना सांगितले जात आहे. त्यामुळे जात पडताळणीसाठीचा अर्ज दाखल करणाऱ्यांना धावपळ करावी लागत आहे.
दहावी आणि बारावी परिक्षांचा निकाल लागला असून पुढील प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची लगबग सुरू झाली आहे. त्यामुळे जात पडताळणीसाठी अर्ज करणाऱ्यांची गर्दी वाढू लागली आहे. परंतु महा-ई-सेवा केंद्र आणि सेतू केंद्रात गेल्यानंतर पालकांना मात्र वेगळाच अनुभव येत आहे. ‘सर्व्हर डाऊन आहे. ऑनलाइन अर्ज भरता येणार नाही,’ असे कारण या केंद्रातून सांगितले जात आहे. ही अडचण कधी दूर होईल, असे विचारल्यानंतर ‘जुलै १० नंतर या’ असे सांगितले जात आहे. त्यामुळे पालकांची मोठी अडचण होत आहे. जात पडताळणी प्रमाणपत्र हे बार्टीकडून दिले जाते. बार्टीचे महासंचालक धम्मजोती गजभिये यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी कोणताही तांत्रिक बिघाड नसल्याचा दावा केला. तसेच आयटी विभागाचे प्रमुख सुमेध थोरात म्हणाले, ‘‘सर्व्हरमध्ये कोणाताही बिघाड झालेला नाही. सर्व्हरवर वापरकर्त्यांची एकाच वेळी गर्दी वाढली, तर काही वेळेस अडथळा निर्माण होतो. लोड बॅलन्सर जोडले जात आहे.’’
गेल्या तीन दिवसांपासून मी महा-ई-सेवा केंद्र आणि सेतू केंद्रांना जात पडताळणी प्रमाणपत्र अर्ज भरण्यासाठी जात आहे. परंतु मला सर्व ठिकाणी सर्व्हअर डाऊन आहे. त्यामुळे ऑनलाइन अर्ज भरता येणार नाही, असे सांगितले जात आहे.
-सोहम शिंदे, विद्यार्थी
रहिवासी दाखला काढण्यासाठी महा-ई-सेवा केंद्रात गेल्यानंतर पहिल्या दिवशी सर्व्हर डाऊन असल्यामुळे काम होणार नाही, असे सांगण्यात आले. त्यानंतर दोन वेळा गेल्यानंतर ऑनलाइन अर्ज भरला. परंतु लोड झाला नाही. किती वेळा एकाच कामासाठी जावे लागणार आहे, हे कळत नाही.
-सपना चव्हाण, विद्यार्थिनी
Web Title: Todays Latest Marathi News Pne22m83049 Txt Pune Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..