
खिशात पैसे न ठेवता एसटी प्रवास!
पुणे, ता. २३ ः एसटी प्रवासात सुट्ट्या पैशावरून प्रवासी व वाहकात होणारे वाद आता कायमचे संपतील. कारण राज्य परिवहन महामंडळाने सुमारे पाच हजार नव्या स्वाईप मशिनची खरेदी केली आहे. त्यामुळे प्रवाशांना आता फोन पे, गुगल आदी ‘युपीआय’द्वारे तिकीट काढता येणार आहे. पहिल्या टप्प्यात सात एसटी विभागांना नवे स्वाईप मशिन देण्यात आले. जुलै महिन्यात उर्वरित विभागांना देण्यात येणार आहे. त्यामुळे आता प्रवाशांना रोख रक्कम जवळ न बाळगता देखील एसटी प्रवास करता येणार आहे.
एसटी प्रशासनाने काही महिन्यापूर्वी स्वाईप मशिनद्वारे तिकीट देण्याची पद्धत सुरू केली. मात्र, त्यावेळी केवळ डेबिट व क्रेडिट कार्डद्वारेच तिकीट दिले जात होते. यात देखील काही अडचण निर्माण होत होत्या. अनेकदा या मशिन बंद पडल्याच्या घटना देखील अनेक विभागांत घडल्या. हे लक्षात घेत एसटी प्रशासनाने नव्या प्रणालीत आवश्यक तो बदल केला आहे. पूर्वीच्या तुलनेने ही प्रणाली अद्ययावत झाली आहे. शिवाय नव्या मशिनमध्ये ‘युपीआय’ची सोय करण्यात आली आहे. त्यामुळे प्रवाशांना फोन पे द्वारे देखील तिकीट काढता येणार आहे.
सात विभागाचा समावेश
- एसटी प्रशासनातर्फे पहिल्या टप्प्यात सात विभागांत सेवा
- यात लातूर, अकोला, यवतमाळ, बुलडाणा, चंद्रपूर, व भंडारा विभागाचा समावेश
- राज्यातील उर्वरित विभागांत जुलै महिन्यांत नवे मशिन उपलब्ध
- वाहकांना विशेष प्रशिक्षण
- नव्या स्वाईप मशिन क्यूआर कोडचा समावेश
- त्याद्वारे प्रवाशांना तिकीट दिले जाणार
प्रवाशांच्या सोयीसाठी हा निर्णय घेण्यात आला असून महामंडळाने पाच हजार मशिन खरेदी केली आहे. वाहकांना देखील प्रशिक्षण देणे सुरु झाले. येत्या काही दिवसांतच प्रवाशांना युपीआय ॲपद्वारे तिकीट मिळेल.
- सुहास जाधव, महाव्यवस्थापक (वाहतूक), राज्य परिवहन महामंडळ, मुंबई
Web Title: Todays Latest Marathi News Pne22m83154 Txt Pune Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..