पाषाण येथे पोलिसावर रिक्षाचालकाचा हल्ला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पाषाण येथे पोलिसावर रिक्षाचालकाचा हल्ला
पाषाण येथे पोलिसावर रिक्षाचालकाचा हल्ला

पाषाण येथे पोलिसावर रिक्षाचालकाचा हल्ला

sakal_logo
By

पुणे, ता. २३ ः रस्त्यावर थांबलेल्या कारच्या काचेवर दगड मारुन नुकसान करणाऱ्या रिक्षाचालकास जाब विचारणाऱ्या तरुणांना रिक्षाचालकाने मारहाण केली. त्यानंतर तरुणांच्या मदतीला धावणाऱ्या पोलिसांनाही रिक्षाचालकाने मारहाण करीत हल्ला केला. या घटनेत एका पोलिस कर्मचाऱ्याच्या बोटांना गंभीर दुखापत झाली आहे. दरम्यान, चतुःशृंगी पोलिसांनी रिक्षा चालकास अटक केली. ही घटना पाषाण येथे बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली.

अनिल प्रकाश सदाशिव (वय ३२, रा. निम्हण आळी, पाषाण) असे अटक केलेल्या रिक्षाचालकाचे नाव आहे. याप्रकरणी पोलिस कर्मचारी दत्तात्रय गेंगजे यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे त्यांच्या सहकाऱ्यासमवेत पाषाण परिसरात बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास गस्त घालत होते. त्यावेळी पाषाण येथील रोनिता हॉटेलजवळ अस्लम अन्सारी व त्यांचे मित्र गणेश थोरात हे दोघेजण त्यांच्या कारजवळ थांबले होते. त्यावेळी तेथून जाणाऱ्या मद्यपी रिक्षाचालकाने कारच्या मागील बाजुला दगड मारुन कारचे नुकसान केले. त्यावेळी दोघांनी रिक्षाचालक अनिल सदाशिव यास जाब विचारला. त्यावेळी त्याने दोघांनाही शिवीगाळ व मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यामुळे दोन्ही तरुणांनी मदतीसाठी आरडाओरडा सुरु केला. त्यावेळी गस्तीवर असणारे फिर्यादी गेंगजे व त्यांचे सहकारी त्यांच्या मदतीसाठी धावले. त्यांनी रिक्षाचालकास समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र रिक्षाचालक सदाशिव याने पोलिसांनाही शिवीगाळ करीन त्यांची वर्दी फाडण्याचा प्रयत्न केला. पोलिस त्यास वाहनामध्ये बसवित असताना त्याने कारचा दरवाजा जोरात ओढला. त्यामध्ये पोलिस अधिकारी बसवराज माळी यांच्या उजव्या हाताची बोटे दरवाजात आल्याने त्यांच्या बोटांना जबर दुखापत झाली. रिक्षाचालकाने आरडाओरडा करीत त्यांनाही धमकी दिली. या प्रकरणाचा तपास सहायक पोलिस निरीक्षक संतोष कोळी करीत आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22m83159 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top