
रुचेल ते बोलावे अन् पचेल ते खावे
पुणे, ता. २६ ः नित्यनेमाने सकाळी व्यायाम, योगा, प्राणायाम करणे आणि वेळेनुसारच रुचेल ते बोलावे आणि पचेल ते खावे या उक्तीप्रमाणे आरोग्याची काळजी घेते. त्यामुळे वयाच्या १०१ व्या वर्षीसुद्धा सुदृढ आरोग्य आहे. सर्वांनी आरोग्याकडे लक्ष दिले पाहिजे. काय खावे, कोणता आहार घेतला पाहिजे. याचे ज्ञान आजकाल सर्वांनाच असते. मात्र, पुरुषांसह महिला देखील व्यसनाच्या मागे धावत आहेत. हे दोघांच्या आरोग्यासाठी चांगले नाही. त्यामुळे कोणीच व्यसन करू नये, असा सल्ला वयाची शंभरी पूर्ण केलेल्या आजीबाईंनी दिला आहे.
योग्य आहार, आरोग्याची नित्यनियमाने घेतली जाणारी काळजी या सूत्रांवर कोणत्याही व्याधींशिवाय वयाची शंभरी पूर्ण केलेल्या इंदुमती पाटणकर यांनी ‘सकाळ’शी संवाद साधला. त्यावेळी त्या बोलत होत्या. वडील आणि पती न्यायाधीश असल्यामुळे जवळपास संपूर्ण महाराष्ट्र त्यांना अनुभवता आला. वडिलांची एकूणच असलेली आहार विषयीची शिस्त हा त्यांचा आदर्श असल्याचे त्या सांगतात. पाटणकर यांनी घरापासून अगदी राजकारणापर्यंतच्या सर्व विषयांवर मनमोकळ्या गप्पा मारल्या.
पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयातून त्यांनी कला शाखेत पदवी प्राप्त केली आहे. स्वच्छतेची, संगीत, नाटक आणि खेळाची त्यांना आवड आहे. कोणतेही काम चोख करायला त्यांना आवडते. बॅडमिंटन खेळामध्ये त्यांना अनेक बक्षीसे मिळाली आहेत. ऐतिहासिक, पौराणिक विषयांवरील पुस्तके वाचायला त्यांना आवडतात. नित्यनियमाने रोजचे वर्तमान पत्र वाचतात.
राजकारण हा विषय आवडतो. हल्लीच्या राजकारणाविषयी वाचले, की वाईट वाटते. पूर्वीच्या राजकारण्यांना देश महत्त्वाचा वाट होता. त्यांना देशाविषयी स्वाभिमान होता. जात, धर्म आपल्या घरात ठेवले पाहिजेत, असे पाटणकर आजी सांगतात.
‘‘प्रत्येक महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून नोकरी करत पुढे जात आहेत. यासोबतच मुलाबाळांकडेही लक्ष दिले पाहिजे. मुलांवर संस्कार होण्यासाठी आईची भूमिका महत्त्वाची ठरते. ज्या घरात आजी आजोबा असतात. तिथे मुलांवर संस्कार होण्यासाठी चांगली मदत होते. घरात संवाद असला पाहिजे. आईवडिलांनी मुलांशी बोलले पाहिजे.’’
-इंदुमती पाटणकर
PNE22S73693
Web Title: Todays Latest Marathi News Pne22m83482 Txt Pune Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..