पावसाळ्यातील रस्तेखोदाईला चाप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पावसाळ्यातील रस्तेखोदाईला चाप
पावसाळ्यातील रस्तेखोदाईला चाप

पावसाळ्यातील रस्तेखोदाईला चाप

sakal_logo
By

पुणे, ता. २५ ः पावसाळ्यात रस्ते खोदाईला बंदी घालण्यात आली आहे; मात्र अचानक खासगी कंपन्यांकडून बेकायदेशीररीत्या रस्ते खोदाईची शक्यता गृहीत धरून पथ विभागाने भरारी पथक नेमण्याचा निर्णय घेतला आहे. हे पथक तीन पाळ्यांमध्ये शहरात फिरून खोदाई रोखण्यासाठी गस्त घालणार आहे.
शहरात वर्षभर जलवाहिनी, मलवाहिनी टाकणे, गॅस वाहिनी, विद्युत वाहिनी टाकणे किंवा मोबाईल व इंटरनेट नेटवर्कसाठी केबल टाकण्यासाठी रस्ते खोदाई केली जाते. त्यासाठी खासगी कंपन्यांकडून प्रतिमीटर १२ हजार १९२ रुपये शुल्क घेतले जाते, तर शासकीय कंपन्यांसाठी याच्या निम्मे दर लावले जातात. गेल्यावर्षभरात सुमारे ६०० किलोमीटरची रस्ते खोदाई शहरात झाली आहे.
पावसाळ्यापूर्वी शहरातील सर्व रस्ते सुस्थितीत असावेत, खड्डे पडू नयेत, यासाठी महापालिकेकडून काळजी घेतली जाते. यासाठी ३० मेपर्यंतच रस्ते खोदाई करावी, त्यानंतर रस्ते लगेचच दुरुस्त करावेत, असे आदेश दिले होते. पण पाणीपुरवठा व मलःनिस्सारण विभागाचे कामाचे अद्यापही सुरू आहे. समान पाणीपुरवठा योजनेचे काम लवकर पूर्ण करायचे असल्याने पाणी पुरवठा विभागास पावसाळ्यातदेखील काम करण्याची परवानगी देण्यात आली आहे.

असे राहणार नियंत्रण
पावसाळ्यात खासगी कंपन्यांना रस्ते खोदाईसाठी परवानगी नाही, तरीही बेकायदेशीरपणे केबल टाकण्याचे प्रकार घडतात. हे प्रकार रोखण्यासाठी पथ विभागाने २४ तास लक्ष ठेवण्यासाठी भरारी पथक नियुक्त केले आहे. त्यात एक उपअभियंता, एक लिपिक, सुरक्षा रक्षक यांचा समावेश असणार आहे. त्यांना एक वाहन दिले असून, त्यांनी शहरात फिरून रस्ते खोदाईचे काम रोखणे आवश्‍यक आहे. या पथकाने रोज काय काम केले, याचा अहवालदेखील त्यांच्याकडून मागविला जाणार आहे. तसेच या पथकाकडून परस्पर विषय मार्गी लावू नये, यावर अधिकाऱ्यांचे नियंत्रण असणार आहे.

पावसाळ्यात रस्ते खोदाईला परवानगी नाही. विनापरवानगी कोणीही सेवा वाहिन्या टाकण्यासाठी रस्ता खोदू नयेत, यासाठी पथक नियुक्त केले आहे. तीन शिफ्टमध्ये हे पथक कार्यरत असेल, या पथकासाठी युटिलिटी व्हॅनची व्यवस्था असणार आहे. रोज कोणत्या भागात पाहणी केली, याचा अहवाल पथकाकडून घेतला जाईल.
- साहेबराव दांडगे, अधीक्षक अभियंता, पथ विभाग

पाणीपुरवठ्यासाठी ५० मीटरची परवानगी
महापालिकेकडून पावसाळ्यात समान पाणी पुरवठा योजनेसाठी जलवहिनी टाकण्याचे काम केले जाणार आहे. पण हे काम करताना वाहतुकीचा खोळांबा होऊ नये, नागरिकांना त्रास हो नये, यासाठी एका वेळी ५० मीटर पेक्षा जास्त लांबीचा रस्ता खोदू नये, ५० मीटरचे काम पूर्ण झाल्यानंतर लगेच रस्ता पूर्ववत करावा, त्यानंतर पुढील काम हाती घेतले जावे, असे आदेश संबंधित ठेकेदार व अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. समान पाणी पुरवठा योजनेसाठी एकूण १६०० किलोमीटरची जलवाहिनी टाकायची आहे, त्यापैकी ७५० किलोमीटरचे काम झाले, मार्च २०२३ पर्यंत उर्वरित ८५० किलोमीटरचे काम पूर्ण करायचे आहे.

अशी होईल कारवाई
- संबंधितावर गुन्हा दाखल करणे
- दंडात्मक कारवाईची तरतूद
- संबंधित रस्ते दुरुस्तीची भरपाई वसूल करणे
- खोदाईसाठी वापरलेले साहित्य जप्त करणे

Web Title: Todays Latest Marathi News Pne22m83730 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top