
सत्कार स्वीकारलेल्या विद्यार्थ्यांवर कारवाई
पुणे, ता. २५ ः महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (एमपीएससी) घेण्यात येणाऱ्या विविध परीक्षांमध्ये निवड झाली आहे, असे खोटे सांगून सत्कार स्वीकारलेल्या विद्यार्थ्यांवर कारवाईचा बडगा उगारल्याची माहिती ‘एमपीएससी’ने ट्विटरवर दिली आहे.
राज्य कर निरीक्षक पदावर निवड झाली नसतानादेखील निवड झाली, असे भासवून सत्कार स्वीकारला. तसेच कागदपत्रांमध्ये खाडाखोड केल्याच्या कारणावरून रामेश्वर पंढरीनाथ लोखंडे या उमेदवाराला सर्व परीक्षा व निवडीसाठी कायमस्वरूपी प्रतिरोधित (डीबार) केले आहे. उप जिल्हाधिकारी पदावर निवड झाली नसतानाही सत्कार स्वीकारल्याच्या कारणावरून वैष्णवी अर्जुन गिरी या उमेदवाराला सर्व परीक्षा व निवडीसाठी कायमस्वरूपी प्रतिरोधित केले. तसेच महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२१ या परीक्षेच्या वेळी भ्रमणध्वनी (मोबाईल) स्वतः जवळ बाळगल्याच्या कारणामुळे प्रवीण शेषराव राऊत या उमेदवारास परीक्षेच्या दिनांकापासून ५ वर्षांसाठी प्रतिरोधीत केले आहे, अशी माहिती ‘एमपीएससी’ने अधिकृत ट्विटरवर दिली.
‘एमपीएससी’कडून विद्यार्थ्यांच्या गैरप्रकाराबाबत कडक धोरण राबविले जात आहे. तसेच ‘एमपीएससी’बाबत आक्षेपार्ह मजकूर लिहिला किंवा टीका-टिपणी संभाषण केल्यास त्या विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यात येईल. या बाबतचे परिपत्रक ‘एमपीएससी’ने यापूर्वीच जाहीर केले आहे. त्यानुसार ‘एमपीएससी’ला शिवीगाळ केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल केला आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Pne22m83878 Txt Pune Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..