जिल्हा परिषद : शिक्षण विभागातर्फे चुकीची बिंदूनामावली सादर शिक्षक बदल्यांचा घोळ मिटेना | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जिल्हा परिषद : शिक्षण विभागातर्फे चुकीची बिंदूनामावली सादर
शिक्षक बदल्यांचा घोळ मिटेना
जिल्हा परिषद : शिक्षण विभागातर्फे चुकीची बिंदूनामावली सादर शिक्षक बदल्यांचा घोळ मिटेना

जिल्हा परिषद : शिक्षण विभागातर्फे चुकीची बिंदूनामावली सादर शिक्षक बदल्यांचा घोळ मिटेना

sakal_logo
By

पुणे, ता. २५ : राज्यातील प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांसाठी आवश्‍यक असलेली बिंदूनामावली शिक्षण विभागाकडून चुकीच्या पद्धतीने तयार करण्यात आली आहे. यावर प्रहार शिक्षक संघटनेने आक्षेप घेतला आहे. अद्याप शिक्षकांची बिंदूनामावलीच अंतिम न झाल्याने, पुन्हा एकदा शिक्षकांच्या बदल्यांचा घोळ कायम राहणार आहे. बिंदूनामावली तयार करण्यासाठी ग्रामविकास आणि सामान्य प्रशासन विभागाच्या सचिवांनी दिलेल्या आदेशाला शिक्षण विभागाकडून केराची टोपली दाखविण्यात आल्याचा आरोप प्रहार शिक्षक संघटनेचे राज्य अध्यक्ष महेश ठाकरे यांनी केला आहे.

जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षक संवर्गाची बिंदूनामावली ही नियमबाह्य पद्धतीने करण्यात आली आहे. यामुळे गेल्या दोन वर्षात बिगर अनुसूचित जमाती क्षेत्राबाहेरील (बिगर पेसा) मागासवर्गीय संवर्गाचे आरक्षण हिरावून घेतले गेले आहे. याबाबत त्वरित दुरुस्ती करण्याचा आदेश शिक्षण सचिवांनी सर्व शिक्षणाधिकाऱ्यांना दिला होता. परंतु, या आदेशानुसार राज्यातील एकाही शिक्षणाधिकाऱ्याने कार्यवाही केली नसल्याचे निदर्शनास आले आहे.

याबाबत ग्रामविकास व सामान्य प्रशासन विभागाच्या सचिवांनी सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि मागास वर्ग विभागाच्या सहायक आयुक्तांना सुधारित बिंदूनामावलीचे आदेश दिले होते. परंतु, या आदेशानंतरही प्राथमिक शिक्षण विभागाने चुकीचीच बिंदूनामावली मागास वर्ग कक्षाकडे सादर केल्याचे ठाकरे यांनी सांगितले.

ही सुधारित बिंदूनामावली तयार करण्यासाठी शिक्षकांनी ८ जून २०२२ रोजी बेमुदत धरणे आंदोलन केले होते. शिवाय शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांच्याकडेही याबाबत तक्रार केली होती. या तक्रारीची दखल घेत कडू यांनी शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघाडणी केली होती. जिल्हा परिषद प्रशासनाने चुकीची कार्यवाही करून ‘बिगर पेसा’मधील आरक्षण संपविल्याचा मुद्दा सरकारनेही मान्य केला होता. तरीही याबाबत शिक्षण विभागाने अधिकाऱ्यांची दिशाभूल करत पुन्हा एकदा नियमबाह्य बिंदूनामावली राज्य मागास वर्ग कक्षाकडे सादर केली आहे. यासंदर्भात शिक्षण विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही.

कार्यवाही न झाल्यास आंदोलनाचा इशारा
जिल्हा परिषद शाळांमधील प्राथमिक शिक्षकांची नियमबाह्य पद्धतीने केलेली बिंदूनामावली सुधारित केली पाहिजे. यासाठी मागील दोन वर्षांपासून सातत्याने प्रयत्न करत आहोत. या मागणीसाठी अनेक वेळा आंदोलनेही करण्यात आली. मात्र, कार्यवाही झाली नाही. राज्य सरकारने आदेश देऊनही त्याची अंमलबजावणी केली जात नाही. किमान आता तरी कार्यवाही करावी; अन्यथा आंदोलन केले करण्याचा इशारा महेश ठाकरे यांनी दिला आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22m83922 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..