
पुण्यातून धावणार ई-शिवनेरी बस
पुणे : राज्य परिवहन महामंडळाची पहिली ई-बस शिवाई पुण्यातून धावल्यानंतर आता ई-शिवनेरीचा प्रवास लवकरच सुरु होणार आहे. पुणे विभागाला ९६ ई-शिवनेरी बस मिळणार आहेत. त्यासाठी नव्या चार्जिंग स्टेशनचे काम सुरु झाले आहे. पुण्याहून ई-शिवनेरी दादर, परळ, ठाणे व बोरिवली या ठिकाणी धावणार आहे. यासाठी पुण्यातील चार्जिंग स्टेशनमध्ये १७ चार्जर उभारले जाणार आहे.
पुणे-नगर ई-शिवाई बसला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. हे लक्षात घेता एसटी प्रशासन आता ई-शिवनेरी बसेस सुरु करणार आहेत. त्यासाठी ओलेक्ट्रा कंपनीच्या बसेस वापरल्या जाणार आहे. त्यासाठी हैदराबाद येथे बसेसची निर्मितीही सुरु केली आहे. या नव्या बसेस आताच्या शिवनेरीच्या तुलनेने खूपच अत्याधुनिक व प्रगत प्रणालीचा वापर करून तयार केल्या जात आहेत. तसेच ग्रीनसेल मोबिलिटीने तयार केलेल्या ई-शिवाईच्या तुलनेत अधिक आरामदायक असतील. यामधून प्रवास करताना प्रवाशांना खड्ड्यांतून बस गेल्यास हादरे बसणार नाहीत, याची काळजी घेण्यात आली आहे. ई-शिवनेरी बस आता धावणार असल्याने सध्या डिझेलवर धावत असलेल्या शिवनेरी लवकरच सेवेतून बाद होण्याची शक्यता आहे.
चार्जिंग स्टेशनचे काम सुरु
पुण्याच्या विभाग नियंत्रक कार्यालयाच्या आवारात मोठे चार्जिंग स्टेशन बांधण्याचे काम सुरु आहे. येथे १७ चार्जर असतील. त्यामुळे एकावेळी १७ बस चार्ज केल्या जातील. यासाठी पुणे विभागाच्या विद्युत विभागासह राजू पवार, अंकेशकुमार विश्वकर्मा व अँथनी फर्नांडिस मेहनत घेत आहेत.
९६ - पुणे विभागाला मिळणार ई-शिवनेरी बस
२४ - बस पुणे-दादर
२४ - बस पुणे-ठाणे
२४ - बस पुणे-परळ
२४ - बस पुणे-बोरिवली
पुण्यात जुलैमध्ये १७ ई-शिवाई
पुणे-नगर मार्गावर धावणाऱ्या ई-शिवाई बसेसच्या संख्येत वाढ होणार आहे. पुणे विभागाला जुलै महिन्यात आणखी १७ ई-बस मिळणार आहे. त्यामुळे पुणे-नगर मार्गासह पुणे-कोल्हापूर व पुणे-नाशिक मार्गावरही ई-शिवाई धावणार आहे. सध्या चार बसेसच्या माध्यमातून ही सेवा सुरु आहे.
पुण्याला ९६ ई-बस मिळणार आहेत. त्यादृष्टीने तयारी सुरु आहे. या बसेस तुलनेने अधिक आरामदायक असतील. त्यामुळे प्रवाशांना वेगळा अनुभव मिळेल.
- यामिनी जोशी, उपसरव्यवस्थापक (वाहतूक), राज्य परिवहन महामंडळ, मुंबई
Web Title: Todays Latest Marathi News Pne22m83964 Txt Pune Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..