
राज्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस
पुणे, ता. २६ : नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) संपूर्ण महाराष्ट्र व्यापला असला तरी, राज्यात सरासरीपेक्षा अत्यल्प पावसाची नोंद झाली आहे. मराठवाडा वगळता मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि कोकणात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडल्याचे हवामान विभागाच्या आकडेवारीतून स्पष्ट होत आहे.
मॉन्सून ११ जूनला राज्यात दाखल झाला. त्यानंतर १६ जूनपर्यंत संपूर्ण राज्य व्यापून मॉन्सूनने पुढील वाटचालीस सुरुवात केली. गेल्या चार ते पाच दिवसांपासून काही ठिकाणी जोरदार पाऊस पडत आहे. यंदा राज्यात सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. पण मराठवाड्याला वगळता इतर भागात आतापर्यंत सरासरीपेक्षा ३० ते ४५ टक्के कमी पाऊस पडला आहे.
पुणे, सातारा, कोल्हापूर, ठाणे, सांगली, रत्नागिरी व रायगड या जिल्ह्यात अत्यल्प पाऊस पडला आहे. पुणे, सातारा आणि नाशिक घाट परिसरात मंगळवारपासून (ता. २८) पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
१ जूनपासून पडलेला पाऊस (मिलिमीटरमध्ये)
विभाग ः सरासरी ः प्रत्यक्ष पडलेला ः टक्केवारी
मराठवाडा ः ११४.६ ः ११९ ः ४
कोकण ः ५६५.३ ः ३७७.८ ः उणे ३३
मध्य महाराष्ट्र ः १२९.३ ः ७०.८ ः उणे ४५
विदर्भ ः १४१.६ ः ८९ ः उणे ३७
सरासरीपेक्षा कमी पाऊस झालेले जिल्हे (टक्केवारी) :
-पुणे ः ५८
-सातारा ः ७४
-सांगली ः ६९
-कोल्हापूर ः ७१
-रायगड ः ५८
-रत्नागिरी ः ५५
-ठाणे ः ५३
पुणे जिल्ह्यामध्ये
६० मिमीची नोंद
पुणे, ता. २६ : जिल्ह्यात १ ते २६ जून या कालावधीत सरासरी १४९.५ मिलिमीटर इतका पाऊस पडतो. मात्र, यंदा या कालावधीत केवळ ६०.५ मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे. हे प्रमाण सरासरीपेक्षा ६० टक्के कमी आहे. याचा परिणाम खरीप हंगामातील पेरणीवर देखील झाला आहे. शेतकऱ्यांना पेरणीसाठी जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे. यंदा चांगल्या पावसाची शक्यता वर्तविल्यामुळे बळिराजा देखील आनंदात होता. परंतु, आता जून महिना संपत आला असून पावसाचा जोर वाढला नाही. पूर्वेकडील भागात काही तालुक्यात अद्यापही पावसाने हजेरी लावली नाही.
Web Title: Todays Latest Marathi News Pne22m83988 Txt Pune Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..