
रवी परांजपे अष्टपैलू चित्रकार
पुणे, ता. २६ ः ‘‘केवळ चित्रकलेच्या माध्यमातूनच नव्हे तर लेखणी आणि शब्दांच्या माध्यमातूनही रवी परांजपे यांनी मोठे काम केले आहे. त्यांनी कलेच्या गुणवत्तेबद्दल कधीच तडजोड केली नाही, कलेबद्दलची दर्जात्मक गुणवत्ता त्यांच्यालेखी खूप महत्त्वाची होती. ते खऱ्याअर्थाने अष्टपैलू चित्रकार होते’’, अशा शब्दांत चित्रकार रवी परांजपे यांना त्यांच्या शिष्यांनी आणि सुहृदांनी रविवारी श्रद्धांजली वाहिली.
याप्रसंगी परांजपे यांच्या पत्नी स्मिता, मुलगा रोहित, गायक शौनक अभिषेकी, चित्रकार मिलिंद मुळीक, ‘चिंटू’कार चारुहास पंडित, लोकमान्य बॅंकेचे संस्थापक अध्यक्ष किरण ठाकूर आदी उपस्थित होते. परांजपे हे बेळगावचे असल्याने त्यांच्याविषयी विशेष स्नेह होता, असे सांगून ठाकूर यांनी परांजपे फाउंडेशनला १० लाख रुपयांची देणगी दिली. तसेच, बेळगावमध्ये परांजपे यांच्या नावाची आर्ट गॅलरी तयार करणार असल्याचे जाहीर केले.
‘परांजपे यांच्या मिश्किल स्वभावातील चुणूक कायम दिसून यायची. चित्रकारच नव्हे तर व्यक्ती म्हणूनही त्यांच्याकडून अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. त्यांच्यात केवळ विद्वत्ताच नव्हती, तर विचारांचे देखणेपण होते. त्यांची सौंदर्यदृष्टी त्यांच्या घरातील नेटकेपणातूनही दिसून येत असे’, असे मालती आगटे म्हणाल्या.
बालकुमार चित्रकला स्पर्धेच्या माध्यमातून परांजपे यांच्याबरोबर केलेल्या कामाच्या काही आठवणी विजय सबनीस यांनी सांगितल्या. कलेचे संस्कार झाले तर तुम्ही हिंसक होत नाही, अशी शिकवण ते नेहमी देत असत, असे सबनीस म्हणाले. ‘‘परांजपे सरांनी केवळ चित्रच रेखाटली नाहीत, तर त्यांनी लिखाणही भरपूर केले आहे. हे लिखाण एकत्र करून त्याचे पुस्तक केले तर नवोदित चित्रकारांना दिशा मिळू शकेल. आम्ही ते काम करू’’, अशी ग्वाही चित्रकार गोपाळ नांदुरकर यांनी दिली. विनया देसाई यांनी सूत्रसंचालन केले.
Web Title: Todays Latest Marathi News Pne22m84067 Txt Pune Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..