Ashadhi Wari : जेजुरीत शैव-वैष्णव परंपरांचा मिलाप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

The union of Shaiv-Vaishnava traditions in Jejuri
जेजुरीत शैव-वैष्णव परंपरांचा मिलाप

जेजुरीत शैव-वैष्णव परंपरांचा मिलाप

जेजुरी - पंढरीच्या सावळ्या विठ्ठलासह मल्हारी मार्तंडाचे गोडवे गात, अष्ठगंध-बुक्क्याबरोबर कपाळी भंडारा, पावसाच्या हजेरीमुळे झालेली चैतन्यमय वाटचाल अशा वातावरणात शैव-वैष्णव परंपरांचा मिलाप साधत माऊलींचा पालखी सोहळा मल्हारगडाच्या कुशीत विसावला. जेजुरीतील भाविकांनी केलेल्या भंडाऱ्याच्या उधळणीने माऊलींच्या रथासह अवघा सोहळा भंडाऱ्यात न्हाऊन निघाला.

सासवड येथील तळावर पहाटे पंचामृत महापूजा संस्थानचे प्रमुख विश्वस्त योगेश देसाई यांच्या हस्ते झाली. त्यानंतर माऊलींचा पालखी सोहळा सासवडमधील दोन दिवसांचा पाहुणचार घेत जेजुरीच्या दिशेने मार्गस्थ झाला. सासवडवासीयांनी पालखी खांद्यावर घेत शहरात आणली. या वेळी रांगोळ्यांच्या पायघड्या घातल्या होत्या. दिंडीमागून दिंडी शहराबाहेर पडत होत्या आणि ग्रामस्थांची दर्शनासाठी गर्दी होती.

कऱ्हा नदीपर्यंत पालखीला निरोप देण्यासाठी सासवडनगरीतील भाविक आले होते. नदी ओलांडून पुढे आल्यावर बोरावके मळा, शिवरी, साकुर्डे, बेलसर फाटा येथील शेतशिवारातील वाटेचा आनंद घेत वारकरी जेजुरीच्या दिशेने पुढे सरकत होते. शिवरीतील दुपारचे जेवण घेतल्यानंतर वारकरी जेजुरीच्या खंडेरायाच्या दर्शनासाठी गर्दी केली होती. पहाटेपासूनच वारकरी गडावर चढाई करताना दिसत होते. शिवरीच्या विसाव्यानंतर पावसाने लावलेल्या हजेरीने सोहळा चिंब झाला.

वारी वो वारी।
देई का गा मल्हारी।।
त्रिपुरारी हरी।
तुझे वारीचा मी भिकारी ।।
असे मल्हारी मार्तंडाची आळवणी करीत आणि माउलींचे अभंग, विठ्ठलाचे गोडवे गात वारकरी जेजुरीकडे सरकत होते. दिंडीतील वारकरी चिंच बागेतील मुक्कामाच्या दिशेने पुढे येत होते. पालखी जेजुरीत येताच येथील ग्रामस्थांनी माउलींच्या पालखी रथावर बेलभंडाऱ्याची उधळण केली. या वेळी पिवळ्या धमक भंडाऱ्याने आसमंत पिवळसर झाला. दरम्यान, कुलदैवतास दर्शन घेऊन सतरा किलोमीटरची पायपीट करून वारकरी दिंड्या सायंकाळी मल्हारनगरीत नऊ एकर जागेतील चिंच बागेत विसावली. त्यानंतर समाजआरती होऊन दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली.

नव्या तळावर उतरला सोहळा
प्रथम माऊलींचा पालखी सोहळा गावठाणात उतरत होता. मात्र, तेथे जागा अपुरी पडत असल्याने तो सहा वर्षांपूर्वी जेजुरी शहराबाहेर लोणार समाजाच्या जागेत तळ हलविण्यात आला. मात्र, काही कारणाने तेथील जागाही यंदा बदलण्यात आली. यंदा पालखी सोहळा मल्हारगडाजवळ चिंचेच्या बागेत मुक्कामी थांबला आहे.

गेल्या तीन वर्षांपासून वारी करते आहे. कोरोनामुळे दोन वर्ष वारी खंडित झाली. मात्र, यंदा पुन्हा वारीत यायला मिळाले. आता विठ्ठलाच्या दर्शनाची ओढ लागली आहे. वारीमुळे ऊर्जा मिळते. सर्व सुखाचे आगार म्हणजे पंढरीची वारी आहे.
- मीनाताई सैद, गिरवली, ता. आंबेगाव, जि. पुणे.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22m84122 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..