
विठ्ठलनामाला वरुणराजाची साथ!
वरवंड - सकाळी ढगाळ वातावरणातील वाटचाल...दुपारनंतर सोहळ्यावर सलग दोन तास जलाभिषेक...चारनंतर हवेतील गारवा वाढला होता. अशा प्रकारे विठुरायाच्या नाम घोषात चिंब झालेले वारकरी व संत तुकोबारायांच्या सोहळा नागेश संप्रदायाची भूमी असलेल्या वरवंडला मुक्कामी विसावला. सोहळा सोमवारी बारामती तालुक्यात प्रवेश करून उंडवडी सुपेकडे मार्गस्थ होईल.
यवत येथे काळूबाई मंदिरासमोर पालखी सोहळा शनिवारी मुक्कामी असताना म्हातारबुवा दिंडी यांचे कीर्तन झाले. तर खेडेकर दिंडीच्या वतीने जागर करण्यात आला. रविवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास सोहळा वरवंडच्या दिशेने मार्गस्थ झाला.
बहुतां दिसांची आजि जाली भेटी ।
जाली होती तुटी काळगती ॥
येथें सावकारों घेईन ते धणी ।
गेली अडचणी उगवोनि ॥
कोरोनाच्या दोन वर्षाच्या काळात सोहळा निघाळा नाही. असा भाव वारकऱ्यांच्या मनात आहे. कोरोनाचे निर्मुलन व्हावे. या जगाच्या कल्याणाच्या हेतूने पांडुरंगाला साकडे घालण्यासाठी वारकरी पंढरीला निघालेत आहे.
यवत भांडगाव अंतर पाच किलोमीटर अंतरावर दुपारचा विसावा आहे. याठिकाणी तासाभरातच पालखी विसाव्यासाठी पोचली. या वाटचालीत ढगाळ वातावरण होते. हवा देखील गरम होती. संत तुकाराम महाराजांचा सोहळा भांडगाव येथे महामार्ग सोडून पाचशे मीटर आत जातो. तेथे रथातील पालखी मंदिरात जात होती. गावात जाणे व येण्यासाठी सुमारे एक तास वेळ लागतो. त्यामुळे, सोहळा आत गावात जाणार नाही. तुम्ही महामार्गावरच स्वागताची व्यवस्था करावी. असे देवस्थानच्या वतीने भांडगाव ग्रामस्थांना सांगितले होते.
ग्रामस्थांच्या आग्रहास्तव सोहळा पालखी रथ गावातील मंदिरापर्यंत घेऊन गेले. ग्रामस्थांनी येथे दर्शन घेतले. अर्धा-पाऊण तास तेथे विसावा घेतला. सोहळा परत महामार्गावर आला. महामार्गावर दुपारच्या जेवणासाठी थांबला. दुपारची जेवण उरकून निघण्याची तयारी असताना अचानक वरुणराजाने जलाभिषेक घालण्यास सुरवात केली.
पाऊस सुरू असताना वाखारी फाटा, चौफुला-बोरीपार्धी विसावा घेऊन स्वागत स्वीकारत वैष्णवांची वाटचाल सुरू होती. दुपारनंतरची वाटचाल सलग दोन तासांच्या जलाभिषेकाणे आताच झाली वारकरी सगळे पावसात चिंब भिजून गेले होते. चौफुला या ठिकाणी आमदार राहुल कुल यांच्या वतीने श्रीसंत तुकोबारायांच्या पादुकांचे दर्शन घेतले. येथून सोहळा मार्गस्थ होताना दिवसभराची वाटचाल छोटी असली तरी ढगाळ वातावरण व पावसाने कठीण केली होती. फक्त तुझी सेवा करण्यासाठी आम्ही निघालो आहे असे वारकरी या अभंगातून व्यक्त करीत होते.
घेईन मी जन्म याजसाठीं देवा ।
तुझी चरणसेवा साधावया ॥
हरिनामकीर्तन संतांचे पूजन ।
घालूं लोटांगण महाद्वारीं ॥
पावसात चिंब झालेला सोहळा हरिपाठाच्या अभंगावर नाचत खेळत संध्याकाळी वरवंडला पोचला. येथे नागेश्वर मंदिरासमोर समाजआरती झाली. त्यानंतर सोळा रात्रीच्या मुक्कामासाठी विसावला. रात्री पालखी समोर कानसुरकर दिंडीच्या वतीने कीर्तन तर जागर म्हातारबुवा दिंडी खानेपुरीकर यांच्यावतीने केला.
घोराडेश्वर दिंडी सहभागी झाली असून अंगणवाडी सेविका म्हणून काम करते. कोरोनाची तीव्रता कमी झाल्याने यंदा सोहळा सुरू झाला पण मला सुट्टी मिळत नव्हती. वारी सुरू होऊन सुट्टी मिळत नसल्याने खूप वाईट वाटत होते. अखेर सुट्टी मंजूर झाली अन खूपच आनंद झाला. कोरोनाच्या काळात फ्रंट वर्कर म्हणून काम केले. जनसेवा हीच ईश्वर सेवा त्यावेळी अधिक प्रखरतेने जाणवले.
- हिराबाई रामभाऊ धुमाळ (रा. किवळे, ता. हवेली)
Web Title: Todays Latest Marathi News Pne22m84136 Txt Pune Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..