शिवसेना मेळावा : संपर्क प्रमुख सचिन अहीर यांचा इशारा बंडखोरांबरोबर रस्त्यावरच लढाई | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिवसेना मेळावा : संपर्क प्रमुख सचिन अहीर यांचा इशारा  
बंडखोरांबरोबर रस्त्यावरच लढाई
शिवसेना मेळावा : संपर्क प्रमुख सचिन अहीर यांचा इशारा बंडखोरांबरोबर रस्त्यावरच लढाई

शिवसेना मेळावा : संपर्क प्रमुख सचिन अहीर यांचा इशारा बंडखोरांबरोबर रस्त्यावरच लढाई

sakal_logo
By

पुणे/कॅन्टोन्मेंट, ता. २६ : ‘‘ज्या घरात तुम्ही मोठे झालात, तेच घर आज तुम्ही उद्धस्त करायला निघालात. परंतु सभागृहात काय व्हायचे ते होईल, मात्र रस्त्यावरच्या लढाईसाठी शिवसेनेसमोरच यावे लागणार आहे, हे लक्षात ठेवा,’’ असा इशारा शिवसेनेचे पुणे जिल्हा संपर्क प्रमुख, आमदार सचिन अहीर यांनी बंडखोरांच्या गटाला दिला.

शिवसेनेत झालेल्या बंडाच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर लोकसभा मतदारसंघातील पक्षाचे पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधींचा मेळावा रविवारी भवानी पेठेतील क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले सभागृहात झाला. या वेळी ते बोलत होते. खासदार श्रीरंग बारणे, माजी आमदार चंद्रकांत मोकाटे, शहर प्रमुख संजय मोरे, महापालिकेतील गटनेते पृथ्वीराज सुतार, महादेव बाबर, रमेश बोडके, रामभाऊ पारिख, गजानन थरकुडे, विजय देशमुख, प्रशांत बधे, सविता मते, पल्लवी जावळे, बाळा ओसवाल, अविनाश साळवे वैभव वाघ आदी या वेळी उपस्थित होते.
अहीर म्हणाले, ‘‘सध्याच्या राजकीय अस्थिरतेच्या परिस्थितीत पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कार्यकर्त्यांनी बळ द्यावे. राज्यातील वारकरी पंढरीच्या वाटेवर असताना दुर्दैवाने काहीजण वेगळी भूमिका घेऊन सुरत आणि गुवाहाटीत जाऊन आपली वेगळी संस्कृती दाखवत आहेत. काही मंडळींनी घर तोडण्याचे काम केले आणि आमदार विकत घेतले. परंतु, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार ते घेऊ शकणार नाहीत. हे विचार लोकांच्या मनात बिंबलेले आहेत. उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राच्या मनातले मुख्यमंत्री आहेत, हे कुणी नाकारू शकणार नाही.’’
‘‘गेल्या काही दिवसांपूर्वी सर्वाधिक निधी मतदार संघाला मिळाल्याचे फ्लेक्स लावणारे आता निधी मिळत नाही, असा आरोप कसे करू शकतात? विधान परिषद आणि राज्यसभा निवडणुकीच्या काळात आदित्य ठाकरे सर्व आमदारांच्या बरोबर होते. तसेच मुख्यमंत्र्यांनी संवाद साधला. तेव्हा या गोष्टीत का बोलले नाहीत,’’ असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

बारणे म्हणाले, ‘‘आमदार फोडाफोडीमागे भाजपच आहे. त्यांना या देशात विरोधक गिळंकृत करायचे असून त्यांची वाटचाल हुकूमशाहीकडे चालली आहे. त्यासाठी सत्तेच्या माध्यमातून तपास यंत्रणांचा गैरवापर केला जात आहे. या परिस्थितीत सर्वांनी एकीने मुकाबला केला पाहिजे.’’ प्रास्ताविक पल्लवी जावळे यांनी केले. मोरे यांनी आभार मानले. मेळाव्यानंतर मुख्यमंत्री ठाकरे यांच्या समर्थनार्थ रॅली काढण्यात आली.

मुख्यमंत्र्यांच्या आजारपणाचा फायदा घेऊन हे षडयंत्र रचण्यात आले आहे. मात्र, मुंबई अथवा पुण्यात शिवसैनिक बंडखोरांना जाब विचारण्यासाठी तयार आहेत. काही काळ उत्साह दाखवणाऱ्या या आमदारांच्या नशिबी निरुत्साह आल्याशिवाय राहणार नाही.
- सचिन अहीर, पुणे जिल्हा संपर्क प्रमुख, शिवसेना

S73891

Web Title: Todays Latest Marathi News Pne22m84141 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..