‘लसवंत’साठी पाऊल पडते पुढे! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘लसवंत’साठी पाऊल पडते पुढे!
‘लसवंत’साठी पाऊल पडते पुढे!

‘लसवंत’साठी पाऊल पडते पुढे!

sakal_logo
By

पुणे, ता. २७ : कोरोनाच्या रुग्णांची संख्या पुन्हा वाढत असल्याने लसीकरणाचा वेग वाढला आहे. राज्यात गेल्या २३ दिवसांमध्ये २५ लाख जणांनी लस घेतली आहे. लसीकरणाचा टक्का वाढण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या ‘हर घर दस्तक’ योजनेला नागरिक प्रतिसाद देत असल्याचे यावरून दिसते.
राज्यात गेल्या सात आठवड्यांपासून कोरोनाच्या रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. सध्या कोरोना नियंत्रणासाठी कोणतेही निर्बंध लागू केलेले नाहीत. त्यामुळे लसीकरण हा एकमेव प्रभावी मार्ग आहे. कोरोनाच्या रुग्णांची संख्या वेगाने वाढणाऱ्या भागात लसीकरणाचा टक्का वाढविण्याच्या सूचना केंद्रीय आरोग्य खात्याने राज्यांना दिल्या आहेत. त्यासाठी ‘हर घर दस्तक’सारखी योजना पुन्हा राबवावी, असेही केंद्राने स्पष्ट केले. त्या अंतर्गत राज्यात लसीकरण मोहिमेने वेग घेतला असल्याचे चित्र दिसते.

लसीकरणात सर्वोत्तम श्रेणी
राज्यात १८ पेक्षा जास्त वयोगटातील नऊ कोटी १४ लाख ३५ हजार नागरिकांना लस देण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. त्यापैकी आठ कोटी ४४ लाख ७१ हजार ९३७ (९२.३८ टक्के) नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लशीचा पहिला डोस घेतला आहे. दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्या सात कोटी पाच लाख ५५ हजार ७८ (७७.१६ टक्के) असल्याची माहिती राज्याच्या आरोग्य खात्यातर्फे देण्यात आली. त्यामुळे या वयोगटातील लसीकरणाने सर्वोत्तम श्रेणी मिळविली आहे. त्यात मुंबई, पुणे ही दोन्ही शहरे आघाडीवर आहेत. मुंबईमध्ये १०१० टक्के नागरिकांचे पूर्ण लसीकरण झाले असून, पुण्यात हे प्रमाण ९५ टक्के आहे. नंदूरबार येथे हे प्रमाण सर्वांत कमी म्हणजे ५२ टक्के आहे.

लसीकरणात सर्वसाधारण
राज्यातील १५ ते १८ वर्षे वयोगटात कोरोनाची रुग्णसंख्या फार मोठी नाही. पण,या वयोगटातील मुला-मुलींमध्ये घरातील ज्येष्ठ नागरिक, सहव्याधी असलेले सदस्य यांना संसर्ग होण्याचा धोका असतो. त्यामुळे या वयोगटातील लसीकरणाला महत्त्व आहे. मात्र, या वयोगटात पहिला डोस ६५.३२ टक्के मुला-मुलींनी घेतला असला तरीही संपूर्ण लसीकरण झालेल्यांचे प्रमाण जेमतेम ४६.७१ टक्के आहे. त्यामुळे या वयोगटातील लसीकरण सर्वसाधारण असल्याने हा टक्का वाढविण्यासाठी ‘हर घर दस्तक’ योजनेत भर देण्यात आला असल्याचे आरोग्य खात्यातर्फे स्पष्ट करण्यात आले.
टक्का वाढण्याची गरज
राज्यात १२ ते १४ वर्षे वयोगटातील ३९ लाख १९ हजार मुला-मुलींपर्यंत लशीचे दोन्ही डोस पोचविण्यात येणार आहे. त्यापैकी फक्त ३१ टक्के (१२ लाख १५ हजार १५६) मुलांचे पूर्ण लसीकरण झाले. तर, ६० टक्के (२३ लाख ५५ हजार १८२) मुलांचे लसीकरण झाले असल्याची माहिती दिली. यात पुणे जिल्हा २३व्या क्रमांकावर आहे. नाशिकने यात आघाडी घेतली असल्याचेही खात्यातर्फे सांगण्यात आले.

आरोग्य खात्याचा भर
- १२ ते १८ वर्षे वयोगटातील मुला-मुलींना लशीचा पहिला आणि दुसरा डोस देणे
- १८ ते ५९ वर्षे वयोगटामध्ये दुसऱ्या डोस देण्यासाठी प्रयत्न सुरू
- ज्येष्ठ नागरिकांनी बूस्टर डोस घ्यावा, यासाठी जनजागृती

राज्यात रोज एक लाखांहून अधिक जण कोरोना प्रतिबंधक लस घेत आहेत. गेल्या काही महिन्यांपूर्वी हे प्रमाण ५० ते ६० हजारांपर्यंत कमी झाले होते. गेल्या २५ दिवसांमध्ये २३ लाख जणांनी लस घेतली आहे. त्यामुळे ‘हर घर दस्तक’ मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येते. शाळा सुरू झाल्याने लहान मुलांच्या वयोगटातील लसीकरणाचा टक्का वाढण्यासाठी प्रयत्न सुरू आहे.
- डॉ. सचिन देसाई, राज्य लसीकरण अधिकारी, महाराष्ट्र राज्य

शाळा सुरू झाल्याने आता नववीतील माझ्या मुलाला कोरोना प्रतिबंधक लशीचा पहिला डोस घेतला आहे. बरोबर २८ दिवसांनी दुसरा डोस घेतल्यानंतर हे लसीकरण पूर्ण होईल. त्यामुळे कोरोना संसर्गाचा धोका कमी होईल, असा विश्वास वाटतो.

- दीप्ती कल्याणकर, पुणे

Web Title: Todays Latest Marathi News Pne22m84530 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..