
वसतिगृहाच्या प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर
पुणे, ता. २८ ः शहरासह राज्यातील शाळा १५ जूनपासून शाळा सुरू झाल्या आहेत. शाळा सुरू होण्यापूर्वीच समाजकल्याण विभागाच्या वसतिगृहासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू होणे अपेक्षित होते, मात्र विद्यार्थ्यांच्या सोयीपेक्षा विभागाला स्वतःची सोय महत्त्वाची वाटते. परंतु उशिरा का होईना विभागाने मंगळवारी (ता. २८) प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. या वेळापत्रकाचे तंतोतंत पालन करावे, अशी अपेक्षा सविता वाघमारे या पालकाने व्यक्त केली.
राज्यातील विविध जिल्ह्यांतील विद्यार्थी शहरातील शाळा, महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेत असतात. त्यांना समाजकल्याण विभागाच्या वसतिगृहांचा आधार असतो, तसेच वसतिगृहात काही कारणास्तव प्रवेश मिळाला नाही, तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा आधार असतो. विभागाच्या संथ कारभारामुळे गेल्या वर्षीचा विचार केला, तर विद्यार्थ्यांचे नुकसान झाले आहे, असे महाविद्यालयीन विद्यापीठ प्रतिनिधी मारुती गायकवाड, वर्षा मोरे यांच्यासह इतर अनेक विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. विभागाच्या कारभाराबाबत सहायक आयुक्त संगीता डावखर यांनी प्रतिक्रिया देण्याचे टाळले, तर आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही.
---------------
मुळची नांदेडची असून मला १२ वी विज्ञान शाखेत चांगले गुण प्राप्त केले आहेत. नर्सिंग अभ्यासक्रमाला प्रवेश घेणार असून, पुढील आठवड्यात शैक्षणिक वर्ष सुरू होणार आहे. वसतिगृहाची प्रवेश यादी ३ ऑक्टोबरमध्ये जाहीर होईल. उशिरापर्यंत प्रवेशासाठी वाट पाहावी लागणार आहे, तोपर्यंत बाहेर राहणे आर्थिकदृष्ट्या राहणे परवडणारे नाही.
- सोनम गायकवाड, विद्यार्थिनी
-------------------
वसतिगृहातील मुलीच्या संख्येत वाढ करावी. १२ वीला ९१.५० टक्के गुण मिळूनही प्रवेश मिळाला नाही. वसतीगृहात सुरक्षित वाटते. आई-वडिलांनादेखील काळजी राहत नाही. त्यामुळे आमच्या मागणीचा विचार विभागाने करावा.
- संघर्षा सदावर्ते, विद्यार्थिनी
--------------------------
वसतिगृहाचे प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक
वर्ग ः प्रवेशासाठी अर्ज करण्याचा कालावधी
- शालेय विद्यार्थी ः १५ जुलैपर्यंत
------------
इयत्ता १० वी आणि ११ वीनंतर अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी (व्यावसायिक अभ्यासक्रम वगळता) ः ३० जुलैपर्यंत
---------------
१२ वीनंतरच्या अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी ः २४ ऑगस्टपर्यंत
------------
व्यावसायिक अभ्यासक्रम ः ३० सप्टेंबरपर्यंत
---------------------
शहरात शासनाची एकूण वसतिगृहे ः २३
प्रवेशासाठी इच्छुक एकूण अंदाजे विद्यार्थी ः ४,००० हून अधिक
-----------------------
विद्यार्थ्यांच्या तक्रारी...
-----------------
- विभागाची प्रवेश प्रक्रिया संथ गतीची, अधिकारी देतात उडवाउडवीची उत्तरे.
- मागील वर्षी महाविद्यालये उशिरा सुरू मात्र प्रवेशप्रक्रिया वार्षिक परीक्षा होईपर्यंत सुरुच होती.
- त्यामुळे काही विद्यार्थ्यांना वसतिगृहात प्रवेश मिळूनही उपयोग झाला नाही.
- स्वाधार योजनेचा लाभ मिळू शकला नाही.
- यंदाचे वेळापत्रक पाहिले तर ही प्रवेशप्रक्रिया डिसेंबर महिन्यापर्यंत लांबणार.
- एकूणच विद्यार्थ्यांचा विचार करता प्रवेश प्रक्रियेला लागणाऱ्या वेळेचा विचार होण्याची गरज.
----------------------
व्हा व्यक्त...
- वसतिगृहाच्या प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक नुकतेच जाहीर झाले. विभागाच्या संथ कारभारामुळे विद्यार्थ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे, याबाबत विद्यार्थ्यांसह पालकांनी आपल्या प्रतिक्रिया नावासह editor.pune@esakal.com या मेलवर किंवा ८४८४९७३६०२ या व्हॉट्सॲप क्रमांकावर कळवा.
----------------------
Web Title: Todays Latest Marathi News Pne22m84644 Txt Pune Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..