
‘आमचा हेमांग गेला, भविष्यात कुणावरही अशी वेळ आणू नका’
पुणे, ता. २८ ः सिंहगड किल्ल्याच्या कल्याण दरवाजाजवळ शनिवारी सकाळी दरड कोसळली. त्याखाली गिर्यारोहक हेमांग गाला हा स्पर्धक अडकला होता. मात्र, त्याठिकाणी आयोजकांनी कोणी आहे का नाही, याचा शोध घेतला नाही. रात्री उशिरापर्यंत कुटुंबीयांना कल्पना दिली नाही. मित्र, बचाव पथकाने शोध घेतल्यानंतर १२ तासांनी हेमांगचा मृतदेह मिळाला. हेमांग नैसर्गिक आपत्तीमुळे गेला आहे. गिर्यारोहकांना आपत्कालीन परिस्थितीत मदत देणे, त्यांची सुरक्षितता व कुटुंबीयांशी संवाद साधण्याकडे आयोजकांनी दुर्लक्ष केले. आमचा हेमांग गेला भविष्यात कुणावरही अशी वेळ येऊ नये, या यादृष्टीने उपाययोजना करा, अशी मागणी हेमांग गाला या तरुणाच्या कुटुंबीय व मित्रांनी केला आहे.
‘सिंहगड एपिक ट्रेक’ ही स्पर्धा सुरू असताना गिर्यारोहक कल्याण दरवाजाजवळ ९.२९ वाजता पोचले. त्यावेळी तेथे दरड कोसळली. त्यामुळे दगड व चिखलामध्ये अडकल्याने हेमांगचा मृतदेह झाला. या घटनेमुळे हेमांगच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. या धक्क्यातून काही प्रमाणात सावरत हेमांगचा मृत्यू नैसर्गिक घटनेमुळे झाल्याचे मान्य करीत, आयोजकांनी निष्काळजीपणा केल्याचा आरोप त्याचे कुटुंबीय अश्विन शहा, मित्र ओंकार कर्वे, राम अय्यर, अक्षय गोखले यांनी केला.
हेमांगचे मामा अश्विन शहा म्हणाले, ‘‘दरड कोसळण्याची घटना सकाळी घडली, त्यानंतर तत्काळ स्पर्धकांची मोजणी करणे आवश्यक होते. आयोजकांनी स्पर्धेचा मार्ग बदलला, परंतु, दरड कोसळलेल्या ठिकाणी कोणी अडकले आहे का, याची पाहणी केली नाही. त्यानंतर स्पर्धा दुपारी बारा वाजता संपली. त्यावेळी स्पर्धक मोजले नाहीत. रात्री उशिरा आम्हाला मुलगा बेपत्ता झाल्याचे समजले. नैसर्गिक आपत्तीमध्ये आमचा मुलगा गेला, परंतु आयोजकांचा निष्काळजीपणाही कारणीभूत आहे. यापुढे तरी स्पर्धा घेण्यापूर्वी काळजी घेतली पाहिजे. त्यांनी सुरक्षितता, सोई-सुविधा व आपत्कालीन प्रसंगात मदत केली पाहिजे.’’
‘‘हेमांगचा मृत्यूची घटना दुर्दैवी असून नैसर्गिक आपत्तीमुळे झाला आहे. दरड कोसळली त्यावेळी आणखीही दरड कोसळण्याची भीती होती, त्यामुळे इतरांचे जीव धोक्यात टाकू नये, यासाठी स्पर्धा वळविली. शेवटचा एक स्पर्धक भेटला, तो भेटल्यानंतर आम्ही पुढे गेलो. संध्याकाळी सहा वाजता स्पर्धकांची मोजणी केली, तेव्हा एकजण बेपत्ता असल्याचे समजले. त्यानंतर दोन पथके, रेस्क्यू टिम शोधासाठी पाठविली. मी स्वतः पोलिसांना कळविले. स्पर्धा भरिवताना इंटरनॅशनल ट्रेल रनिंग असोसिएशन (आयटीआरए) व आदर्श कार्यपद्धतीच्या (एसओपी) नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी केली जाते.
- दिग्विजय जेधे, संस्थापक, संचालक, वेस्टर्न घाट रनिंग फाउंडेशन.
Web Title: Todays Latest Marathi News Pne22m84896 Txt Pune Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..