
तांत्रिक बिघाड ः नागरिकांना माघारी पाठविण्यात येत असल्याच्या तक्रारी प्रशासनाकडे महा-ई सेवा केंद्रांची सेवा अद्यापही ठप्पच
पुणे, ता. २८ : गेल्या काही दिवसांपासून महाआयटीच्या सर्व्हरमधील तांत्रिक बिघाड मंगळवारी रात्री उशिरापर्यंत दुरुस्त होऊ शकला नाही. त्या महा-ई सेवा आणि सेतू केंद्रांची सेवा अद्यापही ठप्पच आहे. त्यामुळे आता जिल्हा प्रशासनाकडे देखील या संदर्भातील तक्रारी येऊ लागल्या आहेत. हा तांत्रिक बिघाड असल्याने तो कधी दूर होणार याबाबत लक्ष लागून राहिले आहे.
राज्य सरकारच्या महाआयटी विभागामार्फत महा-ई-सेवा आणि सेतू केंद्रांच्या माध्यमातून शासकीय अनुज्ञप्ती, जात पडताळणी दाखले-प्रमाणपत्र, रहिवासी प्रमाणपत्र, उत्पन्न दाखले, नागरिकत्व प्रमाणपत्र तसेच अनेक शासकीय कागदपत्रे ऑनलाइन देण्यात येतात. मात्र, गेल्या चार ते पाच दिवसांपासून या सेवा केंद्रांच्या सर्व्हरला तांत्रिक अडचणी येत आहेत. त्यामुळे सर्व्हर संथगतीने सुरू असून केंद्र चालकांकडून विविध दाखल्यांसाठीचे अर्ज स्वीकारले जात आहेत. मात्र, दाखले मिळण्यास विलंब लागत आहे. त्यामुळे अनेक केंद्र चालकांकडून नागरिकांना माघारी पाठविण्यात येत असल्याच्या तक्रारी प्रशासनाकडे करण्यात येत आहेत. परिणामी पुणे शहरातील २५०, तर ग्रामीण भागातील १४३५ महा-ई-सेवा केंद्र आणि १४ सेतू केंद्रांवरील कामे खोळंबली आहेत.
‘‘महाआयटीच्या एकाच सर्व्हरमध्ये राज्यातील सर्व संकलित माहिती (डाटा) साठविण्यात येते. मात्र, यामध्ये तांत्रिक बिघाड असल्याने सर्व्हर बंद पडल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. केवळ पुणेच नाहीतर राज्यातील बहुतांश या केंद्रांची कामे खोळंबली आहेत. मुंबई येथील तज्ज्ञ, माहिती तंत्रज्ञान विभागातील अभियंत्यांकडून दुरुस्तीचे काम सुरू आहे. मात्र, त्याबाबत किती कालावधी लागेल, याबाबत निश्चित सांगता येत नाही.
- हिम्मत खराडे, निवासी उपजिल्हाधिकारी
सेवा लवकर सुरू करण्यासाठी प्रयत्न
महाआयटी विभागाचे मुख्यालय मुंबई येथे असून राज्य स्तरावरील तंत्रज्ञ, अभियंते दुरुस्तीसाठी प्रयत्न करत आहे. याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाकडून सातत्याने मुंबईतील मुख्यालयाशी संपर्क करण्यात येत आहे. लवकरात लवकर ही सेवा सुरू करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे.
----
Web Title: Todays Latest Marathi News Pne22m84909 Txt Pune Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..