
‘वर्क फार्म होम’च असू द्या की!
पुणे - कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढत आहे. घरून काम करीत असताना त्यांचा कामावर कोणताही परिमाण झालेले नाही. ऑफिसमध्ये येऊन काम करणे सोयीचे नाही. घरून काम केले तर बिघडतय काय? असे अनेक मुद्दे मांडत आम्हाला ‘वर्क फार्म होम’च करू द्या, अशी आयटीयन्सची आग्रह मागणी आता पुन्हा जोर धरू लागली आहे. कर्मचाऱ्यांना ऑफिसमध्ये हजर होण्यासाठी दबाव टाकल्यानंतर ते नोकरी सोडण्याची शक्यता निर्माण होते. त्यामुळे कंपन्यादेखील जास्त जोर लावत नसल्याची स्थिती सध्या आहे.
कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रणात आल्यानंतर अनेक आयटी कंपन्यांनी पुन्हा त्यांच्या कर्मचाऱ्यांना कामावर बोलाविण्यास सुरवात केली होती. कर्मचाऱ्यांना कार्यालयात येऊन काम करण्याची सवय व्हावी म्हणून हायब्रीड पद्धत राबविण्यात आली. मात्र, त्यासाठी तीन ते चार दिवस ऑफिसला यावे लागत असल्याने त्यातून देखील अनेकांची गैरसोय होत आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांची देखील पूर्ण वेळ घरून काम करण्याची मागणी होत आहे. या मागणीला आयटी क्षेत्रात उपलब्ध असलेल्या रोजगाराच्या मोठ्या संधीचे पाठबळ मिळाले आहे.
गळती थांबविण्याचे आव्हान
कंपन्यांच्या अवास्तव अपेक्षा, दुसरीकडे उपलब्ध होत असलेली संधी किंवा स्वतःचा व्यवसाय सुरू करायचे कारण देत कर्मचारी नोकरी सोडत आहेत. त्यामुळे राज्यातील काही बड्या आयटी कंपन्यांमधील कर्मचाऱ्याचे नोकरी सोडण्याचे प्रमाण हे एकूण कर्मचाऱ्यांच्या २० ते ३० टक्के आहे. हा दर वाढत गेल्यास कंपनीच्या प्रतिमेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत असल्याने नोकरी सोडणाऱ्यांचे प्रमाण कमी करण्याचे आव्हान कंपन्यांतील व्यवस्थापना समोर आहे.
प्रवास ठरतोय गैरसोयीचा
कोरोनाकाळात नोकरी मिळालेल्या बहुतांश कर्मचाऱ्यांना घरूनच काम देण्यात येर्इल, असे जॉयनिंग वेळी सांगण्यात आले होते. मात्र, आता त्यांना कार्यालयात हजर होण्याच्या सूचना करण्यात येत असल्याने अनेकांना लांबचा किंवा वेळखाऊ प्रवास करून कामावर हजर व्हावे लागत आहे. गेली दोन वर्ष घरून काम करीत असलेल्या कर्मचाऱ्याला हायब्रीड पद्धतीने जरी हजर होण्याच्या सूचना केल्या तरी त्याला ऑफीस असलेल्या शहरात यावे लागत आहे. अन्यथा तो कर्मचारी त्यांच्या मुळ गावावरून किंवा इतर ठिकाणाहून कार्यरत असता.
दबावामुळे कामावर रुजू
आजही जवळपास ९० टक्के आयटीयन्सचे म्हणणे आहे की, घरून काम द्यावे. मात्र, काहीजण कंपनीच्या दबावामुळे कामावर रुजू झाले आहेत. कोरोनाची रुग्ण संख्या वाढत आहे. तसेच आता ऑफिसमधून काम करणे गैरसोयीचे आहे, असे अनेकांचे म्हणणे आहे. ये-जा करण्यासाठी लागणारा वेळ वाचत असल्याने आणि कुटुंबीयांना वेळ देत येतोय म्हणून घरून काम करणारे कर्मचारी खूष असल्याचे चित्र आहे.
मार्चपासून मी ऑफीस जॉर्इन केले आहे. मात्र, त्यापूर्वी दोन वर्ष घरूनच काम केले. त्यामुळे पुण्यात राहण्याचा सर्व खर्च वाचला. तसेच कुटुंबीयांसोबत वेळ घालवता आला. विशेष म्हणजे त्या काळात मी अधिक काम देखील केले. मात्र, आता पुन्हा ऑफिसमधून काम सुरू झाल्याने येथे मनही रमत नाही. त्याचा कामावर परिमाण होत असून राहणे आणि जेवणाची गैरसोय होत आहे.
- आकांक्षा जोशी, आयटीयन
Web Title: Todays Latest Marathi News Pne22m85063 Txt Pune Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..