
जून संपला तरी सुरक्षारक्षक पगाराविना
पुणे, ता. २९ ः पुणे महापालिकेत कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या सुरक्षारक्षकांना गेल्याच आठवड्यात थकीत वेतन मिळणार होते, पण जून महिना संपत आली तरीही अद्याप मे महिन्याचे वेतन मिळालेले नाही. तर दुसरीकडे प्रशासन आणि ठेकेदार यांच्यात बैठकांच्या फेऱ्या सुरू आहेत.
पुणे महापालिकेच्या सुमारे ६०० मिळकतींच्या ठिकाणी सुरक्षारक्षक पुरविण्यासाठी अनेक नाट्यमय घडामोडी व वादाविवादानंतर मे. क्रिस्टल इंटिग्रेटेड सर्व्हिसेस प्रा. लि. या कंपनीला तब्बल ४२ कोटी रुपयांचे काम देण्यात आले. महापालिकेसोबत झालेल्या करारानुसार प्रत्येक महिन्याच्या १० तारखेपर्यंत कंपनीकडून सुरक्षारक्षकांना पगार देणे बंधनकारक आहे, पण कराराचे उल्लंघन होत असून, कर्मचाऱ्यांना पगाराची वाट पाहत बसण्याची वेळ आली आहे.
क्रिस्टल प्रा. लि. कंपनीकडे १५८० सुरक्षारक्षक पुरविण्याचे काम आहे. एप्रिल व मे महिन्याचा पगार थकविल्याने त्यांच्यावर कारवाई करण्याची नोटीस बजावली होती, पण त्यानंतर २५ जूनपर्यंत सर्व कर्मचाऱ्यांचे पगार दिले जातील असे कंपनीकडून आश्वासन दिले होते. मात्र आता एप्रिल महिन्याचा पगार दिला असला तरी मे महिन्याचा पगार अद्याप दिलेला नाही. यासंदर्भात आज (ता. २९) महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडे सुरक्षा विभागाचे अधिकारी व ठेकेदार यांची बैठक झाली. त्याबद्दल माहिती देण्यास अधिकाऱ्यांनी नकार दर्शविला. केवळ बैठकांवर बैठका होत असताना सुरक्षारक्षक मात्र पगारापासून वंचित आहेत.
------------------
आम्ही एप्रिल महिन्याचा पगार दिला असून, आज १५० जणांचा पगार दिला आहे. उर्वरित सुरक्षारक्षकांचा मे महिन्याचा पगार पुढील दोन ते तीन दिवसांत केला जाईल. कागदपत्रे अपूर्ण राहिल्याने पगार देण्यास उशीर झाला आहे. - रविराज लायगुडे, पश्चिम विभाग प्रमुख, क्रिस्टल इंटिग्रेटेड सर्व्हिसेस प्रा. लि.
Web Title: Todays Latest Marathi News Pne22m85299 Txt Pune Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..