कोरोनामुळे ऑनलाइन सल्ल्याला ‘डोस’! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

coronavirus
कोरोनामुळे ऑनलाइन सल्ल्याला ‘डोस’!

कोरोनामुळे ऑनलाइन सल्ल्याला ‘डोस’!

पुणे - ‘कोरोनाच्या डेल्टा व्हेरियंटच्या उद्रेकात मला कोरोना झालेला. नऊ वर्षांची माझी मुलगीही दुसऱ्या दिवशी तापाने फणफणली. तापाची नियमित औषधे देऊनही ताप कमी होईना. बाहेर पडता येत नव्हते. अखेर, आमच्या बालरोग तज्ज्ञांनी व्हिडिओ कॉल करण्याचा सल्ला दिला. तिचा ऑनलाइन तपासले. औषधे बदलून दिली आणि दोन दिवसांनंतर ताप कमी झाला. त्यामुळे जीव भांड्यात पडला,’ खासगी रुग्णालयात परिचारिका असलेल्या गौरी अडसूळ बोलत होत्या.

त्या म्हणाल्या, ‘मुलीची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली. तरीही चार-पाच दिवस ताप कमी होत नव्हता. नऊ वर्षांमध्ये असा ताप कधीच पाहिला नव्हता. घराबाहेर पडण्याची सोय नव्हती. अखेर आधुनिक तंत्रज्ञानाने आम्हाला तारले.’ ‘डॉक्टर डे’च्या निमित्ताने कोरोना काळात ऑनलाइन वैद्यकीय सल्ल्याबद्दल ‘सकाळ’ने अडसूळ यांच्याशी संपर्क साधला. त्यावेळी त्या बोलत होत्या.

ऑनलाइन सल्ल्याची सुरवात

कोरोना उद्रेकापूर्वी घरात बसून डॉक्टरांशी झूम किंवा व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून वैद्यकीय सल्ला घ्यायचा, ऑनलाइन पद्धतीने डॉक्टर रुग्णांना तपासणार, याचा विचारही कोणी केला नव्हता. मात्र, मार्च २०२० मध्ये कोरोना नियंत्रणासाठी देशात लॉकडाउन लागू केले. त्यानंतर घराबाहेर पडता येत नव्हते. डॉक्टरांचा सल्ला घेण्यासाठी ऑनलाइन वैद्यकीय सेवा सुरू झाली.

कोरोना ठरला ‘गेम चेंजर’

कोरोनापूर्वी टेलिमेडिसीन किंवा ऑनलाइन वैद्यकीय सल्ला याबद्दल केंद्र सरकारने नियम कठोर होते. या प्रकारच्या वैद्यकीय सेवेला कोणताच कायदेशीर आधार नव्हता. पण, कोरोना उद्रेकामध्ये रुग्णांपुढे आणि डॉक्टरांपुढे ऑनलाइन वैद्यकीय सेवेशिवाय पर्यायच उरला नाही. कोरोना दरम्यान या नियमांमध्ये तातडीने बदल करण्यात आले. त्यामुळे कोरोनाने टेलिमेडिसीनला बळ दिले.

ऑनलाइन वैद्यकीय सेवेचे फायदे

- रुग्णांचा वेळ वाचतो

- दवाखान्यात येण्या-जाण्याचा खर्च कमी होतो

- रुग्णाची दमणूक होत नाही

- रहदारीचा होणारा त्रास कमी होतो

डॉक्टरांनी स्वीकारण्याची कारणे

- कोरोनामध्ये दवाखान्यातील गर्दी कमी झाली

- ऑनलाइन वैद्यकीय सल्ल्यातील दडपण कमी झाले

- कायदेशीर अधिष्ठान मिळाल्याने मोकळेपणाने वैद्यकीय सेवा सुरू झाली

- कोरोनानंतरही अनेक डॉक्टरांनी हा ऑनलाइन सल्ला सुरू ठेवला

कोरोना उद्रेकात ऑनलाइन वैद्यकीय सल्ल्यासाठी प्रशिक्षण देण्यात आले. त्यामुळे या प्रकारचे वैद्यकीय सेवा करण्यास आता परिचित झालो आहोत. रूबी हॉल क्लिनिकमध्ये टेलिमेडिसनचे स्वतंत्र केंद्र आहे. त्यातून फक्त डॉक्टर आणि रुग्ण असा संवाद होत नाही, तर एखाद्या गुंतागुंतीच्या उपचारात दूरवरील डॉक्टर या माध्यमातून रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्लाही घेतात.

- डॉ. कपिल झिरपे, रूबी हॉल क्लिनिक

कोरोनापूर्वी ऑनलाइन वैद्यकीय सेवा हा प्रकारच नव्हता. त्यामुळे हे प्रमाण शून्य टक्के होते. मात्र, कोरोनाच्या उद्रेकात गर्भवतींनी ऑनलाइन सल्ला घेतला. या दरम्यान हे व्हिडिओ कॉल करून सल्ला घेणाऱ्यांचे प्रमाण खूप वाढले होते. आता कोरोनाचा उद्रेक कमी झाल्यानंतर गर्भवती प्रत्यक्ष येऊन तपासणी करण्यास प्राधान्य देत आहेत.

- डॉ. मिनाक्षी देशपांडे, प्रसूती व स्त्रीरोग तज्ज्ञ आणि अध्यक्ष, आयएमए, पुणे शाखा

Web Title: Todays Latest Marathi News Pne22m85498 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..