
प्रदूषणामुळे वाढणारा कर्करोग ठरतोय डोकेदुखी
प्रदूषणामुळे वाढतो कर्करोग
सावधान!
पुणे, ता. १ : पर्यावरणीय प्रदूषणामुळे कर्करोगाचा धोका सातत्याने वाढत आहे. शहरीकरण, औद्योगिकरण आणि स्थलांतर यामुळे कर्करोगाचे वाढते प्रमाण हे आरोग्य व्यवस्थेपुढची डोकेदुखी ठरत असल्याचे तज्ज्ञांनी स्पष्ट केले.
देशाने सध्या औद्योगिक विकासाचे धोरण स्वीकारले आहे. उत्पादन क्षेत्रावर भर देण्यात आला आहे. त्यातून आरोग्य क्षेत्रातील पायाभूत सुविधा वाढण्यासाठी काही अंशी योगदान मिळाले आहे. मात्र, या प्रदूषणामुळे फुफ्फुस, मूत्रमार्गाशी आणि रक्ताशी संबंधित कर्करोगाचे प्रमाण वाढत आहे. तोंडाचा, श्वसनमार्गाचा, चयापचयाच्या अवयवांचा कर्करोग होण्याचा धोका सातत्याने वाढल्याचे दिसून येते. जल प्रदूषणामुळे पित्ताशयाचा कर्करोगाच्या रुग्णांमध्ये वाढ झाल्याचे निरीक्षणातून समोर येत असल्याची माहिती कर्करोग तज्ज्ञांनी दिली.
डोकेवर काढणारा फुफ्फुसाचा कर्करोग
हवा प्रदूषण आणि फुफ्फुसाचा कर्करोग याचा जवळचा संबंध आहे. पुरुषांमध्ये धूम्रपानाचे प्रमाण स्त्रियांच्या तुलनेत जास्त आहे. त्यामुळे वातावरणातील प्रदूषणाचा फुफ्फुसांवर झालेला नेमका दुष्परिणाम अभ्यासण्यासाठी महिलांच्या फुफ्फुसाचा अभ्यास करण्यात आला. त्यात ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरांमध्ये राहणाऱ्या महिलांमध्ये फुफ्फुसाच्या कर्करोगाचे प्रमाण वाढत असल्याची माहिती पुढे आली. ग्रामीण भागातील महिलांना स्तनाचा कर्करोगाचे फारसे निदान यापूर्वी होत नव्हते. मात्र, आता ग्रामीण भागातही कर्करोगाच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याचे निरीक्षण तज्ज्ञांनी मांडले.
का वाढतोय कर्करोग?
- हवा प्रदूषणाचा आणि कर्करोगाचा संबंध अधोरेखित करण्यासाठी मानवी ‘डीएनए’चा अभ्यास करण्यात आला. ‘जिनोटॉक्सिक’ आणि ‘म्युटेजेनिक’ यावरून कर्करोगाच्या निदानाचा अभ्यास केला जातो. विशेषतः हवा प्रदूषणामुळे फुफ्फुसाच्या कर्करोगाचा कल बदल असल्याचे स्पष्ट झाले आहे. हा अभ्यास प्रकल्प १९९० पासून सुरू आहे.
- नाकातून प्रदूषित हवा शरीरात प्रवेश करत असल्याने श्वसनमार्गाच्या वरच्या टप्प्यातील अवयवांचा कर्करोगाचा धोका जास्त असतो. तसेच स्तनाचा, मूत्राशयाचा कर्करोगाचा संबंधही हवा प्रदूषणाची असल्याचे संशोधनातून सिद्ध झाले आहे. सिगारेट हा कर्करोगाशी थेट संबंधित असल्याची माहिती आपल्याला आहे. पण, प्रदूषित हवा सातत्याने शरीरात गेल्यास ती देखिल कर्करोगाचे कारण ठरू शकते, असा निष्कर्ष यातून निघाला आहे.
शहरातील नागरिकांना धोका
हवा प्रदूषण शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात असल्याने कर्करोगाचा धोका शहरी नागरिकांना जास्त आहे. त्या तुलनेत ग्रामीण भागातील नागरिकांना हा धोका नाही.
चांगल्या आरोग्यासाठी हवा शुद्ध पाहिजे. प्रदूषित हवेतून श्वसन संस्थेशी संबंधित विविध आजार होतात, हे आतापर्यंत दिसून येत होते. आता प्रदूषित हवेमुळे कर्करोगही होत असल्याचे संशोधनातून पुढे आले आहे. कोळसा, लाकूड याचा इंधन म्हणून वापर केल्याने होणाऱ्या हवा प्रदूषणातून डोक्याचा आणि मानेशी संबंधित अवयवांचा कर्करोग होण्याची शक्यता असते.
- डॉ. सुमीत शहा, कर्करोग तज्ज्ञ, प्रोलाईफ कॅन्सर सेंटर ॲण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट
Web Title: Todays Latest Marathi News Pne22m85895 Txt Pune Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..