
पर्यावरणाचा विचाराशिवाय प्रकल्प झाला तर आपण पापी
पुणे, ता. १६ ः ‘‘कोणताही विकास प्रकल्प होणार असेल, तर त्यात पर्यावरणाचा विचार झाला पाहिजे. असा पर्यावरणाला बाधा आणणारा नदी काठ सुधार प्रकल्प होणार असेल, आपल्या सारखे पापी दुसरे कोणी नाही. याप्रकल्पाबाबत उपस्थित केलेल्या प्रश्नावर महापालिकेने समाधानकारक उत्तर दिलेले नाही, आता याची शहानिशा मुख्यमंत्र्यांसमोर होणार आहे,’’ अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार ॲड. वंदना चव्हाण यांनी घेतली.
महापालिकेच्या नदी सुधार प्रकल्पाचे काम सुरू झाले असले, तरी त्यावर आक्षेप असल्याने यासंदर्भात इंडियन मेडिकल असोसिएशनच्या सभागृहात चर्चासत्र आयोजित केले होते. या वेळी लोकप्रतिनिधी, पर्यावरण संघटना, सामाजिक संस्था, संघटनांचे प्रतिनिधी, महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते.
महापालिकेचे सल्लागार गणेश अहिरे यांनी सादरीकरणाद्वारे माहिती दिली. नदीच्या शेजारी १ किलोमीटरच्या परिसरात राहणाऱ्या ४ हजार ७०० नागरिकांचे सर्वेक्षण करून त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. सध्या नदी कुठून वाहते, शेजारच्या जमिनी याचा अभ्यास केला. नदीत पाणी वाढल्यामुळे तापमान कमी होईल, जैवविविधता वाढेल. हा प्रकल्प केवळ सुशोभीकरणाचा प्रकल्प नाही तर नदीचा सर्वंकष विकास करणारा प्रकल्प आहे. यामध्ये कोणतीही व्यावसायिक कामे होणार नाहीत. हा अभ्यास झाल्यानेच पर्यावरण विभागाची या प्रकल्पाला परवानगी मिळाली असल्याचे त्यांनी सांगितले.
पर्यावरण अभ्यासक सारंग यादवडकर यांनी सादरीकरण करून प्रकल्पात त्रुटी असल्याचा दावा केला.
ते म्हणाले की, मुळा-मुठेसह परिसरातील नद्या शहराच्या जवळ उगम पावतात, या नद्या तरुण आहेत, वेगात पूर पातळी वाढेल त्याचा शहराला धोका आहे. जायका प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर १ हजार ५ एमएलडी मैलापाणी शुद्ध होऊन नदीत येणार आहे, पण तरीही ६२९ एमएलडी मैलापाणी नदीत जाणार आहे. भिडे पूलासह चार पूल पाडले जाणार आहेत, सात पुलाची उंची वाढवली जाणार असल्याने गंभीर वाहतूक समस्या निर्माण होईल. ‘टेरी’ या संस्थेने केलेल्या अभ्यासात पुण्यात ३७.५टक्के पावसाचे प्रमाण वाढणार असल्याचे स्पष्ट सांगितले आहे. त्याचा अभ्यास या प्रकल्पात केला नाही. पण याविषयावर महापालिका गंभीर नाही. नदी सुधार प्रकल्प झाला पाहिजे, पण त्या पर्यावरणाच्या दृष्टीने झाला तरच त्यास पाठिंबा आहे.
अधिकाऱ्यांकडून उत्तर नाही
महापालिकेच्या सल्लागाराने सादरीकरण केले, संघटनांची प्रकल्पावर आक्षेप मांडले. पण त्यावर महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी उत्तरे दिली नाहीत. त्यामुळे यावेळी उपस्थित असलेल्या नागरिकांकडूनही नाराजी व्यक्त केली. गेल्या वर्षभरापासून आम्ही प्रश्न विचारत आहोत, पण अधिकारी व सल्लागार उत्तर देत नाहीत. ते केवळ सादरीकरण करतात अशी टीका केली.
Web Title: Todays Latest Marathi News Pne22n11164 Txt Pune Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..