
विद्वानच करतात विषाची पेरणी डॉ. श्रीपाल सबनीस यांचे प्रतिपादन ; रमणलाल शहा लिखित ‘ज्ञानेश्वरी-अमृत संजीवनी’ पुस्तकाचे प्रकाशन
पुणे, ता. १६ ः ‘‘ज्ञानेश्वर आणि तुकारामांमध्ये जातीची भिंत उभी करण्याचा आणि त्यातून ‘ग्यानबा-तुकाराम’ न म्हणता ‘नामदेव-तुकाराम’ म्हणा, असे वारकऱ्यांना सांगणारे करंटे विद्वानही महाराष्ट्राने पाहिले. पण, वारकरी शहाणे आहेत. ज्ञानश्वेर आणि तुकाराम महाराजांमध्ये ते फूट पडू देत नाही. अशा प्रकारच्या विषाची पेरणी विद्वान करत असतात. पण, या विषाची बाधा भक्तीमार्गातल्या सर्वसामान्य माणसाच्या अंतःकरणाला होत नाही. सातशे वर्षांची पंरपरा असलेल्या वारकरी संप्रदायात सर्व जाती-धर्मांचे वारकरी विठ्ठलाच्या चरणी लीन होतात, हे त्याचेच उदाहरण आहे’’, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक, समीक्षक व माजी संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी सोमवारी केले.
प्राचार्य रमणलाल शहा लिखित ‘ज्ञानेश्वरी-अमृत संजीवनी’ या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात ते बोलत होते. ‘संवाद, पुणे’ आणि ‘लोकमंगल ग्रुप शिक्षण संस्था’ यांच्यातर्फे या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. याप्रसंगी डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ सोसायटीचे चेअरमन डॉ. पी. डी. पाटील, ‘सकाळ’ माध्यम समूहाचे संचालक संपादक श्रीराम पवार, लेखक प्राचार्य रमणलाल शहा उपस्थित होते.
पवार म्हणाले, ‘‘भगवद्गीता हा भारतीय तत्त्वज्ञानाचा एक उत्कृष्ट आविष्कार आहे, असे मानले जाते. गीतेचे तत्त्वज्ञान आचरणात आणणे खूप कठीण आहे. गीतेचे सार सांगणाऱ्या ज्ञानेश्वरांनी ‘विवेक’ हा शब्द वापरला आहे. विवेकबुद्धी माणसाला चांगले आणि वाईट, याची निवड करण्यास मदत करते. मात्र, बहुतांश वेळा माणसाचे मन वाईटाची निवड करते. या विवेकाला विकसित करणे, म्हणजे ज्ञानयोगाकडे जाणे होय.’’
डॉ. पी. डी. पाटील म्हणाले, ‘‘रमणलाल शहा यांच्याकडे दांडगा उत्साह आहे, असीम ऊर्जा आहे. त्यांनी अनेकविध पुस्तके लिहिले आहेत. प्रत्येक पुस्तकासाठी तीनशे-चारशे पुस्तकांचा संदर्भ घेतला, असे ते सांगतात. यातून त्यांचे वाचन किती अफाट आहे, याचाच प्रत्यय येतो.’’
लेखक रमणलाल शहा यांनीही मनोगत व्यक्त केले. लोकमंगल ग्रुप शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शिरीष चिटणीस यांनी सूत्रसंचालन केले. ‘संवाद, पुणे’चे सुनील महाजन यांनी आभार मानले.
Web Title: Todays Latest Marathi News Pne22n53924 Txt Pune Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..