विद्यापीठात फक्त १४ प्राध्यापक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विद्यापीठात फक्त १४ प्राध्यापक
विद्यापीठात फक्त १४ प्राध्यापक

विद्यापीठात फक्त १४ प्राध्यापक

sakal_logo
By

सम्राट कदम ः सकाळ वृत्तसेवा
पुणे, ता. २१ ः एकेकाळी पूर्वेचे ऑक्सफर्ड म्हणून नावलौकीक मिळविलेल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला आता उतरती कळा लागली आहे. अनुदानित पदांपैकी तब्बल ५६ टक्के प्राध्यापकांची पदे रिक्त असून, अनेक विभाग प्राध्यापकांविना बंद पडण्याची वेळ आली आहे. त्याहून कळस म्हणजे विद्यापीठात आता फक्त १४ प्राध्यापक राहिले आहे. सहयोगी ३५ तर सहायक पदावर १२० प्राध्यापक कार्यरत आहे.
गेल्या १२ वर्षांपासून प्राध्यापक भरती बंद असल्याचा दूरगामी परिणाम विद्यापीठाच्या दर्जावर झाला आहे. अनेक विभागात संशोधन नेतृत्व करणाऱ्या प्राध्यापकांचीच कमतरता आहे. काही नावाजलेल्या विभागांत फारतर एक-दोन प्राध्यापक आहे. तर काही विभागांमध्ये एकही प्राध्यापक शिल्लक नाही.
याबाबत प्र-कुलगुरू डॉ. संजीव सोनवणे म्हणतात, ‘‘आपल्याकडे मंजूर ३८४ पदांपैकी ५० टक्के पदे रिक्त आहे. विद्यार्थी-शिक्षक गुणोत्तर लक्षात घेता तातडीने प्राध्यापक भरतीला प्राधान्य आहे. शासन स्तरावर प्राध्यापक भरतीला परवानगी मिळावी म्हणून आम्ही पाठपुरावा करणार आहोत. तातडीची गरज म्हणून विद्यापीठ निधीतून तात्पुरती प्राध्यापक भरती निकषांच्या आधारे करण्याचा आमचा विचार आहे.’’

झालेले परिणाम -
- प्राध्यापकांवर एकापेक्षा अधिक विषय शिकविण्याची वेळ
- पूर्णवेळ प्राध्यापकांअभावी विभाग नेतृत्वहीन
- अनेक प्रयोगशाळांतील दिग्गज प्राध्यापक निवृत्त झाल्यामुळे संशोधन बंद
- प्राध्यापकांअभावी विभाग बंद पडण्याची वेळ
- प्राध्यापकांची नवीन पिढी तयार होण्याची प्रक्रिया बंद
- दोन विभागांना एकच विभागप्रमुख

विद्यापीठातील प्राध्यापकांचे विवरण ः
प्राध्यापकांचे पद ः मंजूर अनुदानित पदे ः भरलेली पदे ः रिक्त पदे
प्राध्यापक ः ७० ः १४ ः ५६
सहयोगी प्राध्यापक ः ११७ ः ३५ ः ८२
सहायक प्राध्यापक ः १९६ ः१२०ः ७६
एकूण ः ३८४ ः १६९ ः २१५

दिग्गज विभागांना मोठा फटका ः
विभाग ः मंजूर पदे ः रिक्त पदे
१) रसायनशास्र ः ४२ ः २२
२) भौतिकशास्त्र ः ४० ः २५
३) वनस्पतिशास्त्र ः २० ः ७
४) संख्याशास्त्र ः २० ः १३
५) प्राणिशास्त्र ः १८ ः १०
६) जैवतंत्रज्ञान ः ६ ः ५

७) इंग्रजी ः ८ ः ६
(आकडेवारी १ जुलै २०२२ पर्यंतची आहे.)

अशक्त विभाग ः
पूर्णवेळ एकही प्राध्यापक नाही ः पर्यावरणशास्त्र, मानव्य आणि सामाजिक विज्ञान (आयडीएस), उपकरणशास्त्र
फक्त एक प्राध्यापक ः वातावरण व अवकाशशास्त्र विभाग, ललित कला केंद्र, संरक्षणशास्र, शिक्षणशास्र, अर्थशास्त्र, आरोग्य विज्ञान, क्रीडा, स्री अभ्यास
फक्त दोन प्राध्यापक ः अॅंथ्रोपोलॉजी, सज्ञापनशास्र, इंग्रजी, इतिहास, संस्कृत, समाजशास्त्र,

रिक्त पदांमुळे विद्यापीठ १५ वर्षे मागे गेले आहे. प्राध्यापकांच्या रिक्त पदांचे भीषण परिणाम पुढील पाच वर्षांत जाणवतील. शिक्षणाचा दर्जा तर खालावेल, त्याचबरोबर संशोधनालाही मोठा फटका बसणार आहे. प्राध्यापकांची भरती सातत्याने होत राहिल्यास विभागांचा दर्जा आणि संशोधनात्मक वाढ कायम राहते.
- डॉ. पंडित विद्यासागर,
माजी कुलगुरू, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड

विद्यापीठात रिक्त शिक्षकी पदांवर विद्यापीठ स्तरावर तात्पुरती व्यवस्था करण्यात आलेली असून, विद्यापीठास पदभरतीची परवानगी मिळालेली आहे. यासंबंधी पुढील प्रक्रिया सुरू आहे.
- डॉ. प्रफुल्ल पवार,
कुलसचिव, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

Web Title: Todays Latest Marathi News Pne22n85675 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..