‘आई’पासून वाचण्यासाठी ‘आई’चीच केली ढाल! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘आई’पासून वाचण्यासाठी
‘आई’चीच केली ढाल!
‘आई’पासून वाचण्यासाठी ‘आई’चीच केली ढाल!

‘आई’पासून वाचण्यासाठी ‘आई’चीच केली ढाल!

sakal_logo
By

‘‘अगं कितीवेळ स्वतःच्या आईशी बोलतेस? अधूनमधून माझ्या आईशी बोललं तर जगबुडी होणार नाही?’’ महेशने तृप्तीला टोमणा मारला.
‘‘माझी आई मलापण बोलू देते. माझं म्हणणं ऐकून घेते. तुमच्या आईसारखी १२० च्या स्पीडने सुसाट सुटत नाही आणि टोमणेही मारत नाही.’’ तृप्तीने परतफेड केली.
‘‘म्हणजे माझी आई केवळ टोमणे मारते, असा तुझा आरोप आहे का?’’ महेशने म्हटले.
‘‘नाहीतर काय ! मागच्या आठवड्यात तुम्ही त्यांना फोन केला. त्यानंतर त्या मला म्हणाल्या, ‘सूनबाई, महेश असा चिपाडासारखा वाळत का चाललाय? त्याच्या खोल गेलेल्या आवाजावरून मी ओळखलं. त्याला चांगलंचुंगलं खायला घालीत जा. स्वतः तूप- रोटी खाऊन, लठ्ठ बनशील तर लोकं तुमच्या जोडीकडे बघून, ‘१०’ चा आकडा चाललाय, असे टोमणे मारतील.’ असं त्या म्हणाल्या.’’ तृप्तीने रागाने म्हटले.
‘‘ती माझी आई आहे. तिला माझी काळजी वाटणारच.’’ महेशने बाजू लावून दिली.
‘‘दोनशे किलोमीटरवरून फक्त मोबाईलवर आवाज ऐकून तुमचं चिपाड झालंय, हे त्यांना कसं दिसलं? आणि मी भोपळ्यासारखी होईल, अशी शापवाणी त्यांनी का द्यावी.’’ तृप्तीने म्हटले.
‘‘माझ्या आईने तुला ‘भोपळा’ असं म्हटलं नाही. तिने आपला उल्लेख ‘दहाचा आकडा’ असा केलाय म्हणजे माझा उल्लेख ‘एक’ व तुझा उल्लेख ‘झिरो’ असा केला आहे. याचा अर्थ मी एक नंबर आहे व तू झिरो आहेस, असा होतो.’’ महेशने म्हटले.
‘‘तरीही यात माझा अपमान आहेच की. तरी बरं ! तुमची आई गावावरून दहा- पंधरा दिवस आपल्याकडे राहायला आल्यानंतर मी निमूटपणे त्यांचं सगळं ऐकून घेते. त्या माझा एवढा अपमान करतात, तरी एकदाही मी उलट बोलत नाही. माझ्या माहेरचे संस्कार हो. बाकी काही नाही.’’ तृप्तीने पलटवार केला.
‘‘तोंडावर उलट बोलत नाहीस पण सगळे रिपोर्टिंग आईला फोनवरून करतेस की.’’ महेशने म्हटले.
‘‘पण मी माझ्या आईशीच बोलते ना. तुमच्यासारखं चोवीस तास फेसबुकवर पडीक राहून, सुंदर तरूणी दिसली की लगेचच तिला ‘जेवण झालं का?’ असं विचारत नाही. स्वतःच्या बायकोला कधीतरी हा प्रश्‍न विचारा की.’’ तृप्तीने रागाने म्हटले.
‘‘हे विषयांतर होतंय. विषयाला धरून बोलायला शिक. माहेरी एवढंही तुला शिकवलं नाही का?’’ महेशने म्हटले.
‘‘माझ्या माहेराला यात विनाकारण ओढायचं नाही, आधीच सांगून ठेवते. मी म्हणून टिकले. दुसरी कोणी असती ना तर कधीच पळून गेली असती.’’ तृप्तीने हुकमी अस्त्र बाहेर काढले. त्यानंतर दोघांची चांगलीच जुंपली. तासभर भांडल्यानंतरही कोणी माघार घ्यायला तयार नव्हते. भांडून दमलेल्या तृप्तीने आईला फोन केला.
‘‘आई, यांनी माझ्याशी विनाकारण भांडण केलंय. मी दोन-तीन महिन्यांसाठी माहेरी येते.’’ त्यावर तिची आई म्हणाली, ‘‘भांडण तुझ्या नवऱ्याने केलंय ना. मग शिक्षाही त्यांनाच मिळायला हवी. तू तिथेच थांब मीच तुझ्याकडे चांगली आठ- दहा महिने राहायला येते. मग त्यांची चांगली जिरेल.’’ आईचे बोलणे ऐकून तृप्तीचा चेहरा खुलला. तिने आईचा निरोप महेशला दिला. त्यानंतर महेशने त्याच्या आईला फोन केला.
‘‘आई, माझी तब्येत अगदी चिपाडासारखी झालीय गं. तुझ्या हाताच्या जेवणाची सवय मोडल्यानेच तसं झालंय. तुझ्या हाताला जी चव आहे, ती जगातल्या कोणाऽऽऽकोणाऽऽऽच्या हाताला नाही. त्यामुळे तू तातडीने माझ्याकडे वर्षभरासाठी राहायला ये. तरच माझी तब्येत सुधरेल.’’ असे म्हणून तृप्तीकडे पाहत तो गालातल्या गालात हसू लागला.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22n85876 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..