स्टुलाच्या पायांवरच उभी साहेबाची खुर्ची... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

स्टुलाच्या पायांवरच
उभी साहेबाची खुर्ची...
स्टुलाच्या पायांवरच उभी साहेबाची खुर्ची...

स्टुलाच्या पायांवरच उभी साहेबाची खुर्ची...

sakal_logo
By

‘‘अशी कशी फुलदाणी फुटली? बेजबाबदारपणे काम करायचं कधी सोडून देणार आहात? नवीन साहेब येण्याच्या पहिल्याच दिवशी असा प्रकार घडणं चांगलं आहे का? त्यांच्यासमोर माझं इंप्रेशन काय राहील?’’ महापालिकेतील एका अधिकाऱ्याने शिपाई सखाराम यांना चांगलेच धारेवर धरले होते. खाली मान घालून ते फक्त ‘सॉरी’ ‘सॉरी’ एवढेच म्हणत होते.
आयुक्तपदाची धुरा उन्मेष पाटील आज स्वीकारणार होते. त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी सुरू होती. त्यांची केबिन फुलांनी सजवलेली होती. टेबलवरील महागडी फुलदाणी पुसत असताना सखारामच्या हातातून ती खाली पडली आणि फुटली. केबिनमध्ये काचांचा खच पडला होता. हे पाहून अधिकाऱ्याचे पित्त खवळले होते.
‘‘तुमच्यासारखे शिपाई लोक बेजबाबदारपणे काम करणार असतील तर त्यांनी घरी जावे.’’ अधिकाऱ्याने आवाज चढवत म्हटले. खाली मान घालून सखारामने काचेचे तुकडे जमा केले. त्यानंतर फुलदाणी पडलेली जागा नीट पुसून घेतली.
बरोबर अकराच्या सुमारास आयुक्त पाटीलसाहेब आले. इतर अधिकाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले. केबिनच्या बाहेरील स्टुलावर नेहमीप्रमाणे सखाराम बेल वाजण्याची वाट पहात बसले. पाटीलसाहेबांनी पदभार स्वीकारल्यानंतर सहजच त्यांचे लक्ष काचेच्या छोट्या तुकड्याकडे गेले. त्यांनी ही बाब मघाच्या अधिकाऱ्याच्या निदर्शनास आणून दिली.
‘‘सॉरी सर, शिपायाच्या हातून मघाशी फुलदाणी फुटली. त्याची ती काच असेल. कामात हलगर्जीपणा केल्यामुळे मी त्यांना निलंबित करतो.’’ अधिकाऱ्याने म्हटले व शिपायाला केबिनमध्ये बोलावून घेतले.
‘‘तुमच्या कामचुकारपणाचा फटका कितीजणांनी सहन करायचा? ती काच केबिनमध्ये कशी राहिली? उद्यापासून तुम्ही कामावर येऊ नका.’’ अधिकाऱ्याने झापल्यावर सखारामच्या डोळ्यात पाणी दाटले. ‘‘सॉरी सर’’
‘‘बाबा तुम्ही? तुमची ड्यूटी येथे असते, असं तुम्ही मला सांगितलं नाही.’’ पाटीलसाहेबांनी असं म्हटल्यावर अधिकाऱ्याला धक्काच बसला.
‘‘मि. खैरमोडे तुम्ही कामचुकारपणाचा आरोप ज्याच्यावर करताय, ते माझे बाबा आहेत. त्यांना आयुष्यभर फक्त काबाडकष्टच माहिती आहेत. दिवस-रात्र मेहनत करून त्यांनी मला आणि कल्पनाताईला शिकवलंय. स्वतःच्या सगळ्या इच्छा-आकांक्षांना तिलांजली देऊन, त्यांनी आमच्या पंखात बळ भरलंय. शिपाईपदाच्या नोकरीतून आमचं भागत नव्हतं. त्यावेळी मार्केटयार्डमध्ये त्यांनी हमाली करून, आमच्या शिक्षणासाठी पैसा पुरवलाय आणि तुम्ही त्यांच्यावर कामचुकारपणाचा ठपका ठेवताय?’’ आयुक्तांनी अधिकाऱ्याला समज दिली.
‘‘सॉरी सर! मी गेल्या आठवड्यातच जॉईन झालो आहे. मला माहिती नव्हते, ते तुमचे वडील आहेत.’’ अधिकाऱ्याने म्हटले.
‘‘हे बघा, ते माझे वडील आहेत म्हणून मी हे सांगत नाही. ते खालच्या पदावर आहेत म्हणून तुम्ही त्यांच्याशी वाईट वागत होता, हे चूक आहे. शिपाई हा देखील माणूसच आहे, हे समजून घ्या.’’ आयुक्तांनी असं म्हटल्यावर अधिकाऱ्याने माफी मागितली. त्यानंतर आयुक्तांनी सखाराम यांना पुढे बोलावलं.
‘‘बाबा, फक्त तुमच्यामुळेच मी या खुर्चीपर्यंत पोचलो आहे, याची मला जाणीव आहे. त्यामुळे तुम्ही या खुर्चीवर बसा. तुमचे आशीर्वाद घेऊनच, मी कामकाजाला सुरवात करीन.’’ असे म्हणून आयुक्तांनी सखाराम यांना मानाने खुर्चीत बसवले. त्यांच्या पाया पडून, आशीर्वाद घेतले. गेली तीस वर्षे शिपाई म्हणून आयुक्तांच्या केबिनबाहेर स्टुलावर बसलेले सखाराम आयुक्तांच्या खुर्चीवर बसल्यानंतर कृतार्थ झाले.
‘‘पिंटू, बाप म्हणून माझ्याइतका नशीबवान कोणीच नसेल रे.’’ असे म्हणून सखाराम यांनी आनंदाश्रूंना मोकळी वाट करून दिली.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22n86119 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top