पोलिसांची जागा घेतली वाहतूक कोंडीने | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pune-Traffic
पोलिसांची जागा घेतली वाहतूक कोंडीने

पोलिसांची जागा घेतली वाहतूक कोंडीने

पुणे : ‘वाहनचालकांवर वाहतूक पोलिसांनी दंडात्मक कारवाई करू नये’, असा आदेश दिल्यानंतर शहरातील अनेक चौकांतून पोलिस गायब झाले आहेत. त्यामुळे शहरात निर्माण होत असलेल्या कोंडीबाबत ‘सकाळ’ने प्रसिद्ध केलेल्या बातमीवर नागरिकांनी उस्फूर्त प्रतिसाद देत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून वाहतूक पोलिस पुरेशा संख्येने रस्त्यावर हजर नसल्याने चौकाचौकांत वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे पोलिसांनी वाहतूक सुरळीत करण्यासाठी पुन्हा रस्त्यावर यावे, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे. तसेच, रस्त्यावर असलेल्या पोलिसांची संख्या कमी झाल्याचेही नागरिकांना जाणवले आहे. तर काही चौकांत अजूनही पोलिस दबा धरून बसत आहेत व दंड वसुली सुरू असल्याची तक्रारही काही नागरिकांनी केली आहे.

‘‘बिबवेवाडीतील व्हीआयपी चौक हा धोकादायक झालेला आहे. शाळकरी मुले, तसेच ज्येष्ठांना रस्ता ओलांडणे अवघड झाले आहे. कुठल्याही बाजूने वाहने येत असल्याने अपघात मालिका चौकात सुरूच आहे. शाळा, कॉलेज असल्यामुळे तेथे सिग्नल लावण्याची गरज आहे. तसेच, पोलिसांची उपस्थिती आवश्यक आहे. तरच विद्यार्थी स्त्रिया व ज्येष्ठांना रस्ता ओलांडणे सोपे होईल. याचा पाठपुरावा करून देखील दखल घेतली गेलेली नाही.’’
- राजन बिचे, बिबवेवाडी

‘‘सायंकाळच्या वेळी विमानतळ ते नगर रस्त्यावर तीन सिग्नलला एकही पोलिस नसतो. सिग्नल चालू नसल्यामुळे प्रचंड वाहतूक कोंडी होते. अग्निशमन दलाची गाडी किंवा ॲम्ब्युलन्स अडकली, तर ती निघणे मुश्कील होर्इल.’’
- अनिल वाघ, वडगावशेरी


‘‘अलका टॉकीज चौकात एलआयसी ऑफिसजवळ पूर्वी पाच ते सहा वाहतूक नियंत्रक असायचे. ते अक्षरशः येणाऱ्या-जाणाऱ्या दुचाकी चालकांना थांबूनच पैसे वसूल करीत. पण, गेले दीड महिना झाला तिथे एकही पोलिस दिसत नाही.’’
- कौस्तुभ ठकार, नारायण पेठ

‘‘वाहतूक समस्या दिवसेंदिवस गुंतागुंतीची होत चालली आहे. सातारा रस्ता, बिबवेवाडी भागात वाहतूक नियोजनाचा बोजवारा उडला आहे. शंकरमहाराज पुलाजवळ सिग्नल व्यवस्था आहे, पण वाहतूक पोलिस नसल्याने नागरिक नियम तोडतात. जोपर्यंत अपघात होत नाही, तोपर्यंत यंत्रणा थंड असते. पंचमी हॉटेल, पुष्पमंगल चौक, महेश सोसायटी चौकातही हीच परिस्थिती आहे. वाहतूक शाखा फक्त दंड वसुलीची कारवार्इ त्वरित करते.’’
- प्रकाश वाशीकरस, कात्रज

‘‘संतोष हॉल चौकामध्ये पोलिस नसतात. टिळक रस्त्यालासुद्धा मी हेच अनुभवलं आहे. सध्या ट्रॅफिक पोलिस कोठेही दिसत नाहीत. मुळात दंडात्मक कारवाई बंद झाल्यामुळे त्यांनी रस्त्यावर उभे राहून करायचे काय? हा त्यांना प्रश्न पडला असावा. म्हणून मग ते सध्या चौकीमध्ये आराम करतात.’’
- प्रदीप टौकारी, सनसिटी रस्ता


‘‘अनेक रस्त्यांवर नो एंट्री आहे. तेथे पोलिस कोणतीही कारवाई करत नाहीत. फडके हौद, लाल महाल, स्वारगेट अशा अनेक चौकांत पोलिस सेल तरी ते कोणत्या तरी कोपऱ्यात उभे राहून मोबाईलमध्ये व्यस्त असतात. किंवा सावज कसे मिळेल हे बघत असतात. त्यामुळे रस्त्याने जीव मुठीत धरून जावे लागते.’’

- आशुतोष पत्की, कसबा पेठ

Web Title: Todays Latest Marathi News Pne22o89671 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..