मूत्रपिंड दानात नातेवाइकच आघाडीवर - डॉ. विवेक कुटे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

kidney
मूत्रपिंड दानात नातेवाइकच आघाडीवर - डॉ. विवेक कुटे

मूत्रपिंड दानात नातेवाइकच आघाडीवर - डॉ. विवेक कुटे

पुणे - माझ्या मुलाचे मूत्रपिंडाचे (किडनी) कार्य थांबलेले. तेही वयाच्या अवघ्या तिशी-पस्तीशीत. कोणतं व्यसन नाही की, कोणतं औषधं नाही, काय झाले ते कळाले नाही. पण, मूत्रपिंड प्रत्यारोपण हाच एकमेव उपाय होता. त्यामुळे मी स्वतः पुढे होऊन मूत्रपिंड दान करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे माझा मुलगा आजही माझ्याबरोबर असल्याचा आनंद हा मला एक मूत्रपिंड नसण्याच्या दुःखापेक्षा जास्त मोठा आहे, असे आशालता झगडे म्हणत होत्या.

बनावट कागदपत्र करून पैशाच्या आमिषाने मूत्रपिंड दान केल्याचा खळबळजनक प्रकार पुण्यात उघड झाला. त्यामुळे देशातील वैद्यकीय क्षेत्राला मोठा हादरा बसला आहे. त्या पार्श्वभूमीवर झगडे बोलत होत्या. आपल्या घरातील रुग्णाला वाचविण्यासाठी आधी आपण पुढे आले पाहिजे की, दुसऱ्याच्या घरातील लोकांना मूत्रपिंड दान करण्यासाठी शोधले पाहिजे? मी ज्याला जन्म दिला त्याच्या जीवापेक्षा माझे मूत्रपिंड कसे जास्त महत्त्वाचे ठरू शकते, असा सवाल त्यांनी केला. त्या म्हणाल्या, ‘बनावट कागदपत्रे करून मूत्रपिंडाचे व्यवहार केल्याने या अवयवदानाच्या जीवरक्षक शस्त्रक्रिया धोक्यात येईल. त्याचा मोठा फटका रुग्णांना बसण्याचा धोका आहे.’

देशात जवळचे नातेवाईकच ८५ टक्के किडनी देतात

मूत्रपिंडाचे (किडनी) कार्य थांबलेल्या रुग्णाचे प्राण वाचविण्यासाठी त्याच्या जवळचे नातेवाईक पुढे येतात. त्यामुळे देशात ८५ टक्के मूत्रपिंड दान जिवंत व्यक्ती करतात. त्यातही ८० टक्के शस्त्रक्रिया खासगी रुग्णालयांमध्ये होतात, अशी माहिती ‘इंडियन सोसायटी ऑफ ऑर्गन ट्रान्सप्लांट’चे (आयएसओटी) सचिव डॉ. विवेक कुटे यांनी ‘सकाळ’ला दिली.

ते म्हणाले, ‘देशातील अवयवदानामध्ये मूत्रपिंड दान करण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. रक्ताचे नातेवाईक किंवा जवळचे नातेवाईक बहुतांश करून रुग्णाला मूत्रपिंड देतात. यापैकी कोणाचेच मूत्रपिंड रुग्णाशी जुळत नसेल तर नातेवाइकांशिवाय इतरांचे मूत्रपिंड दान करण्यासाठी शोधले जाते. यात आपल्या जवळच्या व्यक्तीचे प्राण वाचविणे हाच एकमेव उद्देश असतो. त्यात आपुलकी, आत्मीयता असते. व्यवहार नसतो. त्यामुळे देशात ८५ टक्क्यांपर्यंत मूत्रपिंड दान हे अशा प्रकारे जिवंत व्यक्ती करतात. उर्वरित १५ टक्के मृत व्यक्तींकडून रुग्णाला मिळते.’

देशात वेगवेगळ्या कारणांनी विविध अवयवांचे कार्य थांबलेल्या रुग्णांची संख्या मोठी आहे. त्या तुलनेत अवयव दान करणाऱ्यांची संख्या खूप कमी आहे. त्यामुळे अवयवांची मागणी आणि पुरवठा याचे प्रमाण व्यस्त झाले आहे.

- डॉ. विवेक कुटे, सचिव, इंडियन सोसायटी ऑफ ऑर्गन ट्रान्सप्लांट

अवयवदानावर दृष्टिक्षेप

- जिवंत व्यक्तीतर्फे होणारे अवयवदान (मूत्रपिंड, यकृत) : ८० ते ८५ टक्के

- मरणोत्तर अवयवदानाचे प्रमाण : १५ ते २० टक्के

- खासगी रुग्णालयांमधील अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रिया : ८० टक्के

- सरकारी रुग्णालयांमधून होणाऱ्या प्रत्यारोपण शस्त्रक्रिया : २० टक्के

देशात झालेले मूत्रपिंड दान

मूत्रपिंड दानाचे प्रकार .... २०१६......२०१७......२०१८......२०१९......२०२०

जिवंत व्यक्तींचे दान .....५६९७ ..... ६१६५ ..... ६७७२ ..... ८६१३ ..... ४९७०

मरणोत्तर मूत्रपिंड दान ..... १२६१ .....११६९ ..... ११६४ ..... ११३८ ..... ५१६

Web Title: Todays Latest Marathi News Pne22r04149 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top