
गॅस सिलिंडरमध्ये भरून काळ्या बाजाराने विक्री; एकास अटक
पुणे, ता. २० ः टेम्पोमधील सिलिंडर उतरवून त्यामधील गॅस दुसऱ्या सिलिंडरमध्ये अनधिकृतरीत्या भरून त्याची काळ्या बाजाराने विक्री करण्याचा प्रकार पुन्हा एकदा उघडकीस आला. याप्रकरणी गुन्हे शाखेच्या युनिट दोनच्या पथकाने एकाला अटक करून त्याच्याकडून सव्वा दोन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
तुषार ज्ञानदेव चांदगुडे (वय २७, रा. सुपा, बारामती) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. जीवनावश्यक वस्तू कायद्यानुसार फरासखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. गुन्हे शाखेच्या युनिट दोनच्या पथकाकडून गॅस सिलिंडरमधील गॅस काळ्या बाजाराने विक्री करणाऱ्यांचा शोध घेतला जात होता. त्यावेळी दारूवाला पूल येथील गुरुसिंग गुरुद्वारा पार्किंग येथे एक व्यक्ती टेम्पोमध्ये भरलेले सिलिंडर उतरवून रिकाम्या सिलिंडरमध्ये नळीद्वारे अनधिकृतरीत्या भरीत (पल्टिसिलिंडर) आहे, अशी माहिती पथकाला मिळाली. पथकाने संबंधित ठिकाणी छापा टाकून तुषार चांदगुडे यास ताब्यात घेतले. तेथे थांबलेल्या टेम्पोची पाहणी केली. त्यावेळी टेम्पोमध्ये ठेवलेल्या १५ सिलिंडरपैकी भारत गॅस कंपनीचे १९ लिटरचे प्रत्येकी चार सिलिंडर भरलेले व ११ रिकामे सिलिंडर मिळून आले. तसेच एका सिलिंडरमधून दुसऱ्या सिलिंडरमध्ये गॅस भरण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या चार स्टीलच्या नळ्या असा एकूण ३७ हजार ५०० रुपये माल व दोन लाख रुपये किमतीचा टेम्पो असा सव्वा दोन लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.
Web Title: Todays Latest Marathi News Pne22r04167 Txt Pune Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..