कागदपत्र पडताळणीचे काम डॉक्टरांचे नाही | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कागदपत्र पडताळणीचे काम डॉक्टरांचे नाही
कागदपत्र पडताळणीचे काम डॉक्टरांचे नाही

कागदपत्र पडताळणीचे काम डॉक्टरांचे नाही

sakal_logo
By

पुणे, ता. २० : मूत्रपिंड दान करणारी व्यक्ती आणि ते घेणारा रुग्ण यांच्यातील परस्पर नात्यांची पडताळणी करणे, मानवी अवयव व पेशी प्रत्यारोपण कायद्यालाही अपेक्षित नाही. म्हणूनच संपूर्ण प्रक्रियेत २१ पैकी एकाच अर्जावर मूत्रपिंडतज्ज्ञ आणि प्रत्यारोपण शल्यचिकित्सकांची स्वाक्षरी घेण्यात येते, अशी भूमिका ‘इंडियन सोसायटी ऑफ ऑर्गन ट्रान्सप्लँटेशन’ (आयएसओटी) आणि ‘द इंडियन सोसायटी ऑफ नेफ्रॉलॉजी’ (आयएसएन) यांनी शुक्रवारी घेतली.

देशातील अग्रगण्य अशा या दोन्ही संस्थांनी संयुक्त पत्रकार परिषद आयोजित केली होती, त्यात त्यांनी ही भूमिका विशद केली. या वेळी ‘आयएसएन’चे अध्यक्ष डॉ. अनिल भल्ला, निर्वाचित अध्यक्ष डॉ. संजीव गुलाटी, सचिव नारायण प्रसाद, ‘आयएसओटी’चे अध्यक्ष डॉ. सुनील श्रॉफ, निर्वाचित अध्यक्ष डॉ. जॉर्जी अब्राहम आणि संजय अगरवाल उपस्थित होते.

जवळचे नातेवाईक असल्यास अवयवदानाला तातडीने परवानगी मिळते. त्यासाठी आधार कार्ड, विवाह नोंदणी प्रमाणपत्र, रेशनकार्ड, निवडणूक ओळखपत्र, पॅनकार्ड अशी आवश्यक कागदपत्रे रुग्णालयातर्फे घेतली जातात. त्या आधारावर अवयव प्रत्यारोपण प्रक्रिया केली जाते. त्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे २१ अर्ज अवयवदान करणारी व्यक्ती, ते घेणारा रुग्ण, त्यांचे नातेवाईक यांच्याकडून रुग्णालय समिती घेते. यात कोणत्याही प्रकारे पैशांची देवाण-घेवाण झालेली नाही, हे अर्जात ठळकपणे नमूद केले असते. त्यावर दोघांच्याही स्वाक्षऱ्या असतात. यात संपूर्ण प्रक्रियेत रुग्ण अवयव प्रत्यारोपण करण्यासाठी पात्र आहे का? आणि अवयव देणारी व्यक्ती शारीरिकदृष्ट्या सक्षम आहे का? हे पाहण्याची जबाबदारी डॉक्टरांवर आहे. त्यामुळे पुण्यातील मूत्रपिंड प्रकरणात डॉक्टरांवर गुन्हा दाखल करणे, योग्य होणार नाही, असा सूर या पत्रकार परिषदेत निघाला. या प्रकरणात प्रत्यारोपण करणाऱ्या डॉक्टरांना अनावश्यक त्रास सहन करावा लागला आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

‘‘अवयवदानासाठी अत्यावश्यक कागदपत्रांच्या पडताळणीची कोणतीही माहिती डॉक्टरांना नसते. डॉक्टर हे प्रत्यारोपणासाठी प्रशिक्षित असतात, त्यामुळे त्यांच्याकडून हे काम करावे, अशी अपेक्षा ठेवणे हेही योग्य होणार नाही. अशा प्रकरणांमुळे रुग्णाचे प्राण वाचविणाऱ्या डॉक्टरांचे मनोधैर्य खच्ची होते.’’
- डॉ. संजय गुलाटी, निर्वाचित अध्यक्ष, ‘आयएसएन’

Web Title: Todays Latest Marathi News Pne22r04253 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top