पुण्यातील सोसायट्यांचे पाणीटंचाईमुळे आर्थिक नियोजन कोलमडले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Water Supply
सोसायट्यांचे आर्थिक नियोजन कोलमडले

पुण्यातील सोसायट्यांचे पाणीटंचाईमुळे आर्थिक नियोजन कोलमडले

पुणे - भर उन्हाळ्यात पाणीटंचाई जाणवत असल्याने नागरिक मेटाकुटीला आले आहेत. महापालिकेकडून पुरेसे पाणी मिळत नसल्याने टँकरसाठी रोज हजार रुपये खर्च करावे लागत असल्याने सोसायट्यांचे आर्थिक नियोजन बिघडले आहे. गेल्या महिनाभरात शहरात तब्बल ३० हजार ५८० टँकरच्या फेऱ्या झाल्याचे महापालिकेच्या आकडेवारीवरून समोर आले.

पुणे महापालिकेकडून खडकवासला धरण प्रकल्पातून रोज १६०० एमएलडी पेक्षा जास्त पाणी उचलले जाते. मध्यवर्ती भागात पाणीपुरवठा व्यवस्थित असला तरी उपनगरांमध्ये पाणीपुरवठ्याचे चित्र फारसे समाधानकारक नाही. जल केंद्राच्या ठिकाणी देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी पाणीपुरवठा बंद केल्यानंतर पुढचे दोन-तीन दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होऊन त्याचे परिणाम भोगावे लागत आहेत. त्यातच दोन ते तीन आठवड्यांपासून शहरात अघोषित पाणी कपातीचे चित्र आहे. सोसायट्यांना दिल्या जाणाऱ्या पाण्यात पूर्वसूचना न देता कपात केली जात असल्याने गोंधळ उडत आहे. टँकरसाठी फोन केल्यानंतर तेथेही मागणी जास्त असल्याने आठ ते दहा तासांनी सोसायट्यांचा क्रमांक लागत असल्याची स्थिती उपनगरांमध्ये आहे. त्यामुळे रात्रीसुद्धा टँकर सुरू असतात.

दुपटीने होते विक्री

महापालिकेचे स्वतःचे टँकर हे ठरावीक भागात अचानक पाण्याचा प्रश्‍न आला तर तेथे मोफत पाणी देतात. ठेकेदाराचे टँकर हे हद्दीलगतच्या गावांसाठी खास निविदा काढून नियुक्त केलेले आहेत. त्यांच्या फेऱ्या जास्त होतात, तर खासगी टँकरचालक महापालिकेकडे एका टँकरसाठी ६०० रुपयांचे चलन भरून टँकर भरणा केंद्रावरून भरतात. हेच टँकर चालक सोसायट्यांना किमान १ हजार ते १२०० रुपये घेऊन १० हजार लिटरचा टँकर देतात. साधारणपणे २५० सदनिकांच्या सोसायटीसाठी १५ ते २० टँकर एका दिवसासाठी लागतात. त्यामुळे अपुरा पाणी पुरवठा झाल्यानंतर सोसायट्यांचे आर्थिक नियोजन बिघडत आहे.

महापालिकेकडून रोज सुमारे १९ लाख लिटर पाण्याची आवश्यकता आहे. यात सुमारे ४० टक्के कपात आहे. रोज टँकर मागवून घ्यावे लागत असल्याने हजारो रुपये फक्त पाण्यावर खर्च होत असल्याने त्याचा परिणाम सोसायट्यांच्या मेन्टेनन्सवर होत आहे.

- संतोष चौधरी, प्रशासक, डीएसके विश्‍व रोहिणी गृहनिर्माण संस्था, धायरी

पाणीपुरवठा कमी दाबाने होणार याची पूर्वकल्पना न दिल्याने घरातील कामे करतानाही तारांबळ उडते. मग सोसायट्यांना टँकर मागवावे लागतात. पाण्याचे व्यवस्थित नियोजन केल्यास गोंधळ कमी होऊ शकतो.

- स्वाती कुलकर्णी, गृहिणी

उन्हाळ्यात महापालिकेकडून पूर्वसूचना न देता पाणीकपात केली आहे, पाणी कमी आल्याने मग टँकर मागवावे लागतात. त्याच भुर्दंड पडत असल्याने महापालिकेने पाणीटंचाई दूर केली पाहिजे.

- सुजाता आतकरे, गृहिणी

पुणे शहराला व्यवस्थित पाणीपुरवठा केला जात आहे. सध्या धरणातून रोज सुमारे १६०० एमएलडी पाणी उचलले जात आहे. ज्या भागात पाणी कमी आहे, तेथे महापालिकेकडून टँकरने पाणी पुरवठा केला जातो.

- अनिरुद्ध पावसकर, प्रमुख, पाणीपुरवठा विभाग

Web Title: Todays Latest Marathi News Pne22r04576 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top