
‘लोकल सर्कल’चे सर्वेक्षण : नागरिकांसाठी त्रासदायक आर्थिक सेवांबाबतचे स्पॅम कॉल सर्वाधिक
पुणे, ता. २२ : नमस्कार, मी या या कंपनीतून बोलत आहे. तुम्हाला, कर्ज घ्यायचे आहे का? क्रेडीट कार्ड हवंय का? आमच्याकडे गुंतवणुकीची ही नवी स्कीम आली आहे. त्यामध्ये गुंतवणूक करण्यास इच्छुक आहात का? असे त्रासदायक, विक्री किंवा प्रचारात्मक स्पॅम कॉल (उत्पादन, सेवांच्या जाहीरातीसंदर्भात कॉल) तुम्हालाही येतच असतील. यामध्ये ५० टक्क्यांहून अधिक कॉल हे आर्थिक सेवेसंदर्भातील असल्याची बाब नुकत्याच एका सर्वेक्षणातून पुढे आली आहे.
सातत्याने वाढत असलेले स्पॅम कॉल, संदेश नागरिकांसाठी त्रासदायक ठरत आहेत. याची दखल घेत ‘लोकल सर्कल’च्यावतीने देशातील ३७० हून अधिक जिल्ह्यांत स्पॅम कॉलशी निगडित सर्वेक्षण करण्यात आले. त्यानुसार सर्वाधिक स्पॅम कॉल हे आर्थिक सेवा पुरवठ्यासंबंधित असल्याचे मत नागरिकांनी मांडले. तसेच देशातील ६४ टक्के नागरिकांना तीन व त्यापेक्षा अधिक स्पॅम कॉल दररोज येत असल्याचेही या सर्वेक्षणातून समजले. असे कॉल टाळण्यासाठी बऱ्याचदा नागरिक विविध प्रकारचे ॲप वापरतात. मात्र, तरी देशातील प्रत्येक वापरकर्त्याला महिन्याला सरासरी १७ कॉल येत असल्याचे यातून स्पष्ट होत आहे.
आकडे बोलतात :
स्पॅम कॉलबाबत नागरिकांचे मत (टक्केवारीत)
आर्थिक सेवा पुरवठ्याशी संबंधित ः ५१
रिअल इस्टेट विक्री ः २९
नोकरी संदर्भात ः ३
आरोग्य व पॅथॉलॉजी सेवा ः ८
स्पा, ब्युटी पार्लर आदी सेवा ः १
मोबाईल डेटा प्लॅन, मोबाईल सेवा ः ३
सांगता येत नाही ः १
इतर ः ४
या कॉलला उत्तर कसे देता?
कॉलबाबत माहिती देणाऱ्या ॲपचा वापर ः १४
स्पॅम कॉल घेणे व नंतर त्यांना ब्लॉक करणे ः ४२
काहीच न करणे : ७
मोबाईलमध्ये नोंद असलेले फोन घेणे : १४
फोन घेणे व पुन्हा कॉल करू नये हे सांगणे ः २१
स्पॅम कॉलला उत्तर देणे ः २
कॉलच्या माहितीसाठी वापरले जाणारे ॲप
- ट्रूकॉलर
- कॉलॲप
-कॉल कंट्रोल
- हिया
- कॉल ब्लॅकलिस्ट
- नुमोरोबो
Web Title: Todays Latest Marathi News Pne22r04837 Txt Pune Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..