
हिंदू- मुस्लीम एकता वृद्धिंगत व्हावी : डॉ. कुमार सप्तर्षी
पुणे : ‘‘माणसाला जोडतो, तो धर्म आणि माणसाला माणसापासून तोडतो, तो अधर्म होय. भारताच्या भूमीत बंधुभाव आहे. सर्व धर्मातील चांगल्या कल्पना आपण स्वीकारल्या पाहिजे. द्वेष वाढवून देश टिकणार नाही. हिंदू-मुस्लीम एकता वृद्धिंगत होणे गरजेचे असून त्यासाठी त्यांना एकत्र आणणारे कार्यक्रम झाले पाहिजे’’, असे मत युवक क्रांती दल आणि महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे अध्यक्ष डॉ. कुमार सप्तर्षी यांनी व्यक्त केले.
‘जमाते इस्लामी हिंद, पुणे’तर्फे ईद मिलन कार्यक्रम आणि ‘धर्म, अधर्म आणि धार्मिकता’ या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. या परिसंवादात डॉ. सप्तर्षी बोलत होते. ख्रिश्चन धर्मगुरू रेव्हरंड चित्रलेखा जेम्स आणि जमाते इस्लामी हिंदचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तौफीक अस्लम खान हे या परिसंवादात सहभागी झाले होते. तौफीक अस्लम खान म्हणाले, ‘‘जोपर्यंत शिक्षण होत नाही, तोपर्यंत प्रगती, जागृती होणार नाही. सर्व धर्मांची माहिती होण्यासाठी भेटीगाठी होत राहिल्या पाहिजे.
भारतातील विविधता हीच मोठी शक्ती आहे.’’ चित्रलेखा जेम्स म्हणाल्या, ‘‘शाश्वत जीवन जगायचे असेल इतरांचा कळवळा आला पाहिजे. ज्याला इतरांचा कळवळा येणार नाही, त्याला धर्म कळणार नाही. देवावर आपण जेवढे प्रेम करतो, तेवढे शेजाऱ्यांवर केले पाहिजे. भारतातील आजच्या परिस्थितीत धार्मिकतेचा अर्थ परिपूर्ण न्याय हा असला पाहिजे.’’ परिसंवादानंतर शिरखुर्म्याचा आस्वाद घेऊन कार्यक्रमाचा समारोप झाला. करीमुद्दीन शेख यांनी आभार मानले.
Web Title: Todays Latest Marathi News Pne22r04903 Txt Pune Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..