
उत्पन्न २०० रूपये अन् खर्च आठ लाख
प्रसाद कानडे : सकाळ वृत्तसेवा
पुणे, ता. २२ ः पुणे -फलटण असो वा लोणंद -फलटण डेमू (डिझेल इलेक्ट्रिक मल्टिपल युनिट) असो याला शोधून देखील प्रवासी मिळत नाही. दिवसाला चार ते सहा प्रवाशांसाठी ही डेमू धावते. जितके प्रवासी तितकेच कर्मचारी गाडीत. एका फेरीतून रेल्वेला २०० रुपये उत्पन्न मिळते. मात्र, त्यासाठी रेल्वेला रोजचे तब्बल आठ लाख रुपये खर्चावे लागते. पुणे विभागाची ही सर्वात जास्त तोट्यात असणारी डेमू. यासाठी डेमूचा रेक अडकून पडल्याने तो अन्य मार्गावर वापरला जात नाही. त्यामुळे होणारे नुकसान हे वेगळेच.
प्रवाशांची सोय व्हावी या हेतूने रेल्वे प्रशासनाने पुणे-फलटण, लोणंद-फलटण ही डेमू सेवा सुरु केली. मात्र त्याला काही केल्या प्रवासीच नाही. त्यामुळे रेल्वेला रोज आठ लाख रुपयांचा तोटा सहन करत ही डेमू सुरु ठेवावी लागते. आठ लाख रुपये हा केवळ डिझेलवर होणार खर्च आहे. यात अन्य खर्च समाविष्ट नाही. तो जर समाविष्ट केला तर खर्चाच्या आकड्यात आणखी वाढ होईल.
काय सांगतात आकडे : कालावधी (१० फेब्रुवारी ते १८ एप्रिल २२ ) तिकिटे प्रवासी उत्पन्न
पुणे- फलटण डेमू : ५३ दिवस ४२९ ६०६ २७ हजार
फलटण -लोणंद ५३ दिवस ५९ ५९ १७७०
लोणंद -फलटण ५३ दिवस २० २९ ९९०
फलटण - पुणे ५३ दिवस २५९ ४१९ १९ हजार ७०५
एकूण : ७६७ १११३ ४९ हजार ७९०
या चारी गाड्यांची सरासरी काढली तर रोज ४ तिकिटे आणि ६ प्रवासी प्रवास करतात. त्यासाठी खर्च मात्र आठ लाख रुपयांचा करावा लागत आहे.
तर अन्य मार्गावर याचा वापर :
सध्या पुणे विभागात डेमू व मेमू रेकची
कमतरता आहे. पुण्यासाठी चार मेमू रेकची मागणी ‘आयसीएफ’कडे केली आहे. मात्र, ते मिळण्यात आणखी काही महिने लागतील. हीच परिस्थिती डेमूच्या बाबतीत आहे. अत्यंत कमी प्रतिसाद लाभत असलेला रेक पुणे -दौंड अथवा पुणे- मिरज मार्गावर वापरला तर त्याला प्रतिसाद चांगला मिळेल. याशिवाय या मार्गावरच्या प्रवाशांची सोय होईल.
प्रवाशांची सोय व्हावी या हेतूने डेमू सेवा सुरु केली. आम्ही पुणे- फलटण -लोणंद मार्गावर धावणाऱ्या डेमूच्या प्रवासी संख्या व उत्पनावर लक्ष ठेवून आहोत. योग्यवेळी योग्य निर्णय घेऊ.
- डॉ. स्वप्नील नीला,
वरिष्ठ विभागीय परिचालन व्यवस्थापक, पुणे
Web Title: Todays Latest Marathi News Pne22r05007 Txt Pune Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..