
मूर्तिशास्त्रातून समाजाचा सर्वांगीण अभ्यास : देगलूरकर प्रा. प्र. के. घाणेकर यांच्या सहा पुस्तकांचे प्रकाशन
पुणे, ता. २२ : ‘‘समाज परिवर्तन, समाज प्रबोधन आणि सामाजिक अभिसरण या सगळ्या गोष्टी मूर्तींच्या अभ्यासातून कळतात. त्यामुळे मूर्तिशास्त्राद्वारे समाजाचा सर्वांगीण अभ्यास करता येतो,’’ असे प्रतिपादन मूर्तिशास्त्राचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. गो. बं. देगलूरकर यांनी रविवारी केले.
ज्येष्ठ लेखक प्रा. प्र. के. घाणेकर लिखित आणि स्नेहल प्रकाशनतर्फे प्रकाशित सहा पुस्तकांच्या प्रकाशन समारंभात ते बोलत होते. प्रा. घाणेकर यांच्या लिखाणात सहसा दोष आढळून येत नाही, असे गौरवोद्गारही त्यांनी काढले. या प्रसंगी चिपळूण येथील लोकमान्य टिळक वाचनालयाचे अध्यक्ष प्रकाश देशपांडे, प्रकाशित पुस्तकांपैकी एका पुस्तकाचे सहलेखक आशुतोष बापट, स्नेहल प्रकाशनाचे रवींद्र घाटपांडे आदी उपस्थित होते.
देशपांडे म्हणाले, ‘‘कोकणात प्रचंड वैभव आहे. मात्र ते दाखवायला आम्ही कमी पडतो, त्याबाबत अनास्था आहे. अशावेळी प्र. के. घाणेकरांनी लिहिलेली पुस्तके या वैभवाचे कोश म्हणून काम करतात. त्यातूनच हे वैभव लोकांपर्यंत पोचते.’’ तसेच, कोकणातील रायगडासारखी स्थळे आमच्यासाठी देवालयासारखी आहेत. त्यामुळे इथे पर्यटनाला येताना या स्थळांचे पावित्र्य जपा, असा सल्लाही त्यांनी दिला. प्रा. घाणेकर यांनी मनोगतात पुस्तक लेखनामागील भूमिका विशद केली. घाटपांडे, बापट यांनीही मनोगत व्यक्त केले.
पंचाहत्तरीचा सुवर्णयोग
विविध निसर्गस्थळे, गडकोट, मंदिरे, वारसास्थळे यांच्या भ्रमंतीवर आधारित अनुभवांवर सातत्याने लिखाण करणाऱ्या घाणेकर यांची आतापर्यंत ६९ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. प्रा. घाणेकर वयाच्या पंचाहत्तरीत प्रवेश करत असताना या सहा पुस्तकांच्या प्रकाशनाच्या निमित्ताने त्यांच्या पुस्तकांचीही पंचाहत्तरी साजरी करण्याचा दुग्धशर्करा योग साधला गेला. या पुस्तकांमध्ये रायगडाच्या परिसरात, किल्ले वसई, यादवांची देवगिरी, विदर्भाचा विज्ञानवैभव वारसा - लोणार, मेहकरची विष्णूमूर्ती – त्रिविक्रम (शारंगधर बालाजी) आणि शिल्पसमृद्ध कोकण या सहा पुस्तकांचा समावेश आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Pne22r05023 Txt Pune Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..