राज्यात तंटामुक्त गृहनिर्माण संस्था अभियान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राज्यात तंटामुक्त गृहनिर्माण संस्था अभियान
राज्यात तंटामुक्त गृहनिर्माण संस्था अभियान

राज्यात तंटामुक्त गृहनिर्माण संस्था अभियान

sakal_logo
By

पुणे, ता. २३ : ग्रामीण भागात आपसांतील वाद सामोपचाराने सोडविण्यासाठी राज्य सरकारने २००७ मध्ये ‘महात्मा गांधी तंटामुक्त गाव’ अभियान सुरू केले. या धर्तीवर राज्य सरकारने आता शहरी भागासाठी ‘तंटामुक्त गृहनिर्माण संस्था’ अभियान सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेचा प्रारंभ पुण्यात गुरुवारी (ता. २६) सहकारमंत्र्यांच्या उपस्थितीत होणार आहे.
गृहनिर्माण संस्था आणि अपार्टमेंटमधील कामकाजाबाबत सभासदांच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. तथापि कायद्यानुसार उत्कृष्ट कामकाज करणाऱ्या अनेक संस्था असून, इतर संस्थांनीही त्यांचे अनुकरण केल्यास सहकारी गृहनिर्माण संस्थांचे व्यवस्थापन चांगल्या प्रकारे होईल. या अभियानांतर्गत गृहनिर्माण संस्था, तालुका आणि जिल्हा स्तरावर सल्लागार समित्या नेमण्यात येतील. सल्लागार समिती तक्रार अर्जाचे निराकरण करून अर्जदारास निर्णय कळवतील. सल्लागार समितीने दिलेला निर्णय तक्रारदारास मान्य नसल्यास तक्रारीच्या स्वरूपानुसार निबंधक, सहकारी न्यायालय, दिवाणी न्यायालय, स्थानिक प्राधिकरण, महापालिका, पोलिस किंवा गृहनिर्माण फेडरेशनकडे अर्ज करता येईल. तसेच, तंटामुक्त अभियानात सहभाग नोंदवून उत्कृष्ट कामकाज करणाऱ्या गृहनिर्माण संस्थांना सन्मानित करणार आहे, अशी माहिती सहकार आयुक्त अनिल कवडे यांनी दिली.


‘डिम्ड कन्व्हेयन्स’वर चर्चा
सहकार विभाग, महाराष्ट्र राज्य गृहनिर्माण संस्था फेडरेशन आणि ‘सकाळ माध्यम समूह’च्या वतीने मानीव हस्तांतरण (डिम्ड कन्व्हेयन्स) आणि तंटामुक्त गृहनिर्माण संस्था अभियानाबाबत मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या (पीडीसीसी) मुख्य सभागृहात गुरुवारी (ता. २६) सकाळी १०.३० वाजता हा कार्यक्रम होणार आहे. सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, सहकार राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम, सहकार आयुक्त अनिल कवडे, ‘सकाळ’ पुणे आवृत्तीचे संपादक सम्राट फडणीस, फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे, उपाध्यक्ष सुहास पटवर्धन आदी उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमास गृहनिर्माण संस्थांच्या पदाधिकारी आणि सभासदांनी उपस्थित राहावे, असे आवाहन केले आहे.


तंटामुक्ती गृहनिर्माण संस्था समितीचे कामकाज
- सभासदाने लेखी तक्रार अर्ज व्यवस्थापन समितीकडे सादर करावा
- समितीच्या बैठकीत तक्रार अर्जावर चर्चा करून निर्णय घेणे
- व्यवस्थापन सभेचा निर्णय १५ दिवसांत कळविणे आवश्यक
- निर्णयावर समाधान न झाल्यास सल्लागार समितीकडे तक्रार करता येईल

संस्थेची सल्लागार समिती
- सर्वसाधारण सभेने निवडलेला अध्यक्ष
- व्यवस्थापकीय समितीचे दोन सदस्य
- संस्थेचे प्रमाणित व वैधानिक लेखापरीक्षक
- गृहनिर्माण फेडरेशनचा प्रतिनिधी

१ लाख १५ हजार १७२
- राज्यातील सहकारी गृहनिर्माण संस्था

गृहनिर्माण संस्थांमध्ये सौहार्दपूर्ण वातावरण निर्माण होण्यासोबतच नागरिकांचे जीवन सुखी-समाधानी व्हावे, यासाठी तंटामुक्त गृहनिर्माण संस्था अभियान राबविणार आहे. तसेच, कायद्यानुसार उत्कृष्ट कामकाज करणाऱ्या गृहनिर्माण संस्थांना सन्मानित करण्यात यावे, हा या अभियानामागील उद्देश आहे.
- अनिल कवडे,
सहकार आयुक्त, महाराष्ट्र राज्य


आपल्या सूचना पाठवा...
गृहनिर्माण संस्थांनी या कार्यक्रमास उपस्थित राहण्यासाठी नावनोंदणी करावी. तसेच, डिम्ड कन्व्हेयन्स आणि तंटामुक्त गृहनिर्माण संस्था अभियानाबाबत आपल्या सूचना editor.pune@esakal.com व punefed@gmail.com या इ-मेल आयडीवर किंवा ८४८४९७३६०२ या व्हॉटसअप क्रमांकावर पाठवाव्यात.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22r05142 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..