तडजोडीने फुलले २२१ जोडप्यांचे संसार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

couple
तडजोडीने फुलले २२१ जोडप्यांचे संसार

तडजोडीने फुलले २२१ जोडप्यांचे संसार

पुणे - राजा-राणीचा सुखी संसार असे म्हणत वैवाहिक जीवनाची सुरुवात केली जाते. जिथे प्रेम असते तिथे वादही असतात, असे म्हटले जाते. हेच वाद कधी इतके विकोपाला जातात की थेट घटस्फोटासाठी न्यायालयाची पायरी गाठली जाते. मात्र ही पायरी चढण्यापूर्वी जोडप्यांमधील गैरसमज दूर करून पुन्हा ही दुभंगलेली मने एकत्र आण्यासाठी प्रयत्न केले जातात. पुण्यातील समुपदेशन केंद्रामार्फत ११०१ प्रकरणांपैकी २२१ जोडप्यांचे समुपदेशन करून तडजोडीअंती त्यांचा सुखाचा संसार पुन्हा फुलवण्यास यश आले आहे. सध्या ४९ प्रकरणे प्रलंबित आहेत.

कौटुंबिक न्यायालयात ऑगस्ट २०१८ मध्ये राज्य विधी सेवा प्राधिकरण, उच्च न्यायालय मुंबई व जिल्हा सेवा प्राधिकरण पुणे यांच्यातर्फे ‘चला बोलूया’ दाखलपूर्व विवाहविषयक वादासाठी समुपदेशन केंद्र सुरू केले आहे. यामध्ये वैवाहिक/कौंटुंबिक स्वरूपाचे वाद प्रत्यक्षात न्यायालयात दाखल होण्यापूर्वी जोडप्यांना मोफत मार्गदर्शन करून त्यांना पुन्हा एकत्र आणण्याचा किंवा त्यांच्यात परस्पर संमतीने तडजोड करण्याचा प्रयत्न केला जातो.

या केंद्रामध्ये पती-पत्नी, पोटगी, अज्ञान मुले, मालमत्ता यासंबंधीचे वाद याव्यक्तिरिक्त आई-वडील व मुलांमधील पोटगी किंवा सांभाळण्याबाबतचे वाद यांचा समावेश आहे. या केंद्राकडे पोलिस आयुक्त कार्यालयाकडून व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण कार्यालयाकडे येणाऱ्या पक्षकारांची प्रकरणे पाठविली जातात. मुंबई उच्च न्यायालयातील रेवती मोहिते डेरे, न्यायमूर्ती साधना जाधव व प्रमुख न्यायाधीश सुभाष काफरे यांच्या मार्गदर्शनाखाली कौटुंबिक न्यायालयाच्या न्यायाधीश मनिषा काळे या केंद्राचे प्रमुख म्हणून काम पाहतात. जिल्हा सेवा प्राधिकरणाचे सचिव न्यायाधीश प्रताप सावंत या केंद्राच्या दैनंदिन बाबींकडे लक्ष देत आहेत. जोडप्यांनी वैवाहिक स्वरूपाच्या वादाबाबत प्रत्यक्ष न्यायालयात खटला दाखल करण्यापूर्वी या वादपूर्व समुपदेशन केंद्रामध्ये आपापसांत चर्चा करून परस्पर संवादाने वाद मिटवून घ्यावेत, असे आवाहन न्यायाधीश काफरे यांनी केले आहे.

‘चला बोलूया’ समुपदेशनामुळे...

- कोरोनाकाळात समुपदेशकांनी आभासी व प्रत्यक्षपणे समुपदेशनाचे काम केल्यामुळे ११७ जोडपी पुन्हा नांदायला गेली.

- जोडप्यांना स्वखुशीने तडजोडीचा पर्याय निवडण्याचे स्वातंत्र्य

- १०४ जोडप्यांनी परस्पर संमतीने घटस्फोटाची केली तडजोड

Web Title: Todays Latest Marathi News Pne22r05346 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :punefamily
go to top