विधवांच्या कुप्रथा बंद करण्याचा मुद्दा लोकसभेत मांडणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विधवांच्या कुप्रथा बंद करण्याचा मुद्दा लोकसभेत मांडणार
विधवांच्या कुप्रथा बंद करण्याचा मुद्दा लोकसभेत मांडणार

विधवांच्या कुप्रथा बंद करण्याचा मुद्दा लोकसभेत मांडणार

sakal_logo
By

पुणे, ता. २३ : ‘‘विधवांच्या बाबतीतील कुप्रथा बंद करण्यासाठी महाविकास आघाडी सरकारकडे पाठपुरावा केल्यावर ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, महिला व बालविकास कल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी तातडीने त्याची दखल घेतली. त्या बाबतचा शासकीय आदेश (जीआर) प्रसिद्ध केला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील हेरवाडला जे जमते ते राज्यातील अन्य ग्रामपंचायतींनाही जमू शकते,’’ असे सांगत त्या बाबत आगामी काळातही कार्यरत राहणार असल्याचे प्रतिपादन खासदार सुप्रिया सुळे यांनी सोमवारी केले. हा मुद्दा लोकसभेतही मांडणार असल्याचे त्यांनी सांगितले.
पुणे जिल्हा परिषदेच्या थेट लाभ हस्तांतराचे (डीबीटी) उद्‍घाटन सुळे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी त्या बोलत होत्या. या कार्यक्रमात दीड लाख विद्यार्थी, ८ हजार अंगणवाडी सेविका, ३ हजार ९३ आशा सेविका यांना जिल्हा परिषदेतर्फे ५ कोटी १५ लाख रुपयांचे अनुदान वाटप केले. या वेळी सुळे म्हणाल्या, ‘‘कोल्हापूर जिल्ह्यातील हेरवाड गावात विधवांच्या बाबतीतील सर्व कुप्रथा बंद करण्याचा निर्णय ग्रामपंचायतीने घेतला. त्याची माहिती ‘सकाळ’चे संपादक सम्राट फडणीस यांनी आणि एका वृत्तवाहिनीने मला कळविली. हेरवाड जे करू शकते, ते राज्यातील सर्वच ग्रामपंचायती करू शकतात, असे वाटले. त्यामुळे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, महिला व बालविकास कल्याणमंत्री यशोमती ठाकूर यांच्याकडे पाठपुरावा केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही या बाबत सांगितले. महाविकास आघाडी सरकारने याची लगेच दखल घेतली. कुप्रथा बंद करण्यासाठीचा शासकीय आदेशही मुश्रीफ यांनी प्रसिद्ध केला.’’
या कार्यक्रामाचे प्रास्ताविक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी केले. आशा सेविका मयूरी पवार तसेच गीता आयवळे, पूर्वा निंबाळकर यांनीही मनोगत व्यक्त केले.


कुप्रथा बंद करण्यासाठी समाजात जागरूकता निर्माण करणे गरजेचे आहे. त्यासाठी खासदार अमोल कोल्हे यांच्यासह मी कोणत्याही मदतीला तयार आहे. या बाबतचे व्हिडिओही तयार करण्यास आम्ही दोघे कार्यरत राहणार असल्याचे सुळे म्हणाल्या. जिल्हा परिषदा, अंगणवाडी सेविका, आशा सेविकांचे प्रश्न लोकसभेत मांडत असतेच, आता हेरवाडचाही मुद्दा मांडणार आहे.
सुप्रिया सुळे, खासदार

Web Title: Todays Latest Marathi News Pne22r05356 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..