
‘बालगंधर्व’त मिळणार जागतिक दर्जाच्या सुविधा
पुणे - बालगंधर्व रंगमंदिराच्या पुनर्विकास आराखड्यात बदल करून सुधारित आराखडा तयार करण्याचे काम महापालिका प्रशासनाने हाती घेतले आहे. यामध्ये मोठ्या सभागृहाची आसन क्षमता वाढविण्यासह जागतिक दर्जाच्या सुविधा देण्यासाठीचे नियोजन केले जात आहे. प्रशासनाने ही तयारी सुरू केली असली तरी कलावंतांचा ‘बालगंधर्व’च्या पुनर्विकासास विरोध कायम आहे.
पुण्याच्या सांस्कृतिक क्षेत्रातील मानबिंदू म्हणून बालगंधर्व रंगमंदिराची ओळख आहे. राज्यातील कलाकारांनाही बालगंधर्वमध्ये त्यांची कला सादर करायला मिळावी, अशी तीव्र इच्छा असते. गेल्या ५४ वर्षांपासून बालगंधर्व हे पुण्याच्या सांस्कृतिक, राजकीय, सामाजिक जडणघडणीचे साक्षीदार आहे. बालगंधर्व रंगमंदिर जुने झाल्याने तेथे नवे नाट्यगृह बांधले जावे, यासाठी महापालिकेतील पदाधिकारी, नाट्य, चित्रपट क्षेत्रातील तज्ज्ञांची समिती नेमून वास्तूविशारदांकडून प्रस्ताव मागविण्यात आले. २४ पैकी एक प्रस्ताव महापालिकेने अंतिम केला. गेल्याच महिन्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमोर ‘बालगंधर्व’बाबत सादरीकरण झाल्यानंतर त्यांनी त्यामध्ये महत्त्वाचे बदल सुचविले आहेत. महापालिकेने बालगंधर्वच्या पुनर्विकासासाठी प्रयत्न सुरू केले असले तरी कलाकारांमधून विरोधाचा सूर आला आहे. पुनर्विकासाची गरजच नाही इथपासून ते बालगंधर्व पाडल्यानंतर पुढील तीन वर्ष येथील कलाकारांची उपजीविका कशी भागणार असे प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत.
असे असतील बदल
१) बालगंधर्वमध्ये पुनर्बांधणीनंतर ८००, ५०० व ३०० क्षमतेचे तीन नाट्यगृह असतील.
२) दोन कला दालने, दोन खुले सभागृह, वाहनतळाचा समावेश
३) नव्या बदलानुसार ८०० ऐवजी एक हजार क्षमतेचे नाट्यगृह प्रस्तावित
४) कला, संस्कृतीचा वारसा सांगणारे सुशोभीकरण
५) ध्वनी व प्रकाश व्यवस्था उत्तम दर्जाची करण्यासाठी बदल
६) बालगंधर्वचे प्रवेशद्वार, नैसर्गिक हवा आणि प्रकाश यावरही भर
मुंबईतील जिओ मॉलच्या पाहणीनंतर त्याप्रमाणे चांगल्या दर्जाचे नाट्यगृह उभारण्यासाठी आराखड्यात बदल केला जात आहे. त्याचे काम महापालिकेचे अधिकारी व वास्तूविशारदांच्या माध्यमातून सुरू आहेत. यामध्ये नाट्यगृहाची आसन क्षमता वाढवणे, चांगल्या प्रकारच्या सुविधा यादृष्टीने बदल केले जातील. त्यास मान्यता मिळाल्यानंतर पुढील प्रक्रिया केली जाईल.
- विक्रम कुमार, आयुक्त, महापालिका
बालगंधर्व पाडण्यास आमचा विरोध आहे. सध्याच्या बालगंधर्वचे वैशिष्ट्य म्हणजे नाटकाचा सेट चढविणे किंवा उतरवणे यासाठी लिफ्ट लागत नाही. कलाकार, रसिक अवघ्या काही पायऱ्या चढून थेट नाट्यगृहात जातात. पुनर्विकास झाल्यानंतर नाट्यगृह वरच्या मजल्यावर जाणार. तेथे आम्ही नाटकाचे साहित्य कसे न्यायचे, हा विचार झालेला नाही. त्यामुळे नाट्यगृह पाडण्यापेक्षा त्याची योग्य पद्धतीने डागडुजी केली तर आणखी २५ वर्षे नाट्यगृहास काहीही होणार नाही.
- विजय पटवर्धन, उपाध्यक्ष, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, पुणे शाखा
कलाकारांच्या मागण्यांची निवेदने जसे कचऱ्याच्या पेटीत टाकली जातात, तसेच बालगंधर्वच्या पुर्नविकासाचा आराखडा कचऱ्यात टाका. हे नाट्यगृह पाडण्यास आमचा विरोध आहे. स्वच्छता गृह व इतर काही गैरसुविधा आहेत, त्याकडे व्यवस्थित लक्ष दिल्यास पुढील २५ वर्षे बालगंधर्वला काही होणार नाही.
- रजनी भट, ज्येष्ठ अभिनेत्री
तुम्हाला काय वाटते?
बालगंधर्व रंगमंदिराचा पुनर्विकास होणार असून जागतिक दर्जाच्या सुविधा देण्यासाठीचे नियोजन केले जात आहे. याला मात्र कलावंतांचा विरोध आहे. याबाबत आपले मत नावासह editor.pune@esakal.com या मेलवर किंवा ८४८४९७३६०२ या व्हॉट्सॲप क्रमांकावर कळवा.
Web Title: Todays Latest Marathi News Pne22r05505 Txt Pune Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..