
चालकांनी शोधावी अपघाताची कारणे
पुणे, ता. २४ ः रस्ता सुरक्षिततेबाबत जागृती करण्यासाठी चालकांसाठी प्रशिक्षण, मार्गदर्शन व वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केल्याने पीएमपी चालकांना याचा नक्कीच फायदा होईल. तसेच चालकांनी अपघाताची कारणे शोधली तर अपघात कमी होतील, असे मत पिंपरी चिंचवडच्या सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी राजश्री गुंड यांनी व्यक्त केले.
पीएमपीच्या चालकांसाठी २४ ते १ जून या कालावधीत सात दिवशीय प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन केले आहे. या कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी पीएमपीचे जनरल मॅनेजर सुबोध मेडसीकर, सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक अभिजित वसगडे, सुनील बुरसे, राजेश रूपनवर, सतीश गाटे, विक्रम शितोळे यांची उपस्थित होते.
गुंड म्हणाल्या, “पीएमपी बसेसच्या अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी चालक सेवकांना सात दिवस प्रशिक्षणाचे आयोजन केले आहे. या प्रशिक्षण कार्यक्रमासाठी पिंपरी चिंचवड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील सहाय्यक मोटार वाहन निरिक्षक यांचेकडून चालकांना त्यांच्याकडून होणाऱ्या चुका कोणत्या, अपघाताची कारणे कोणती व ती कशी टाळता येतील, याबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे.’’
मेडसीकर म्हणाले, ‘‘चालक हा समाजामधील नाक, कान व डोळे असून चालकावरच पीएमपी प्रतिमा तयार होते. तसेच चालक व वाहक यांनी लोकांना चांगली सेवा दिली तर त्यांची जनमानसात चांगली प्रतिमा तयार होत असते. त्यामुळे अधिकाऱ्यांचीही चांगली प्रतिमा तयार होत असते.’’
यावेळी वसगडे यांनी चित्रफितीद्वारे रोडमार्किंग, ट्रॅफिक सिग्नलचे प्रकार, ट्रॅफिकचे नियम मोडल्यास किती दंड व शिक्षा असते याबाबतची माहिती दिली. तसेच अपघात टाळण्यासाठी कोणती काळजी घ्यावी याबाबत मार्गदर्शन केले. प्रास्ताविक गाटे यांनी केले. मेडसीकर यांनी आभार मानले.
Web Title: Todays Latest Marathi News Pne22r05793 Txt Pune Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..