ई-दुचाकींत बदल करणाऱ्याविरुद्ध मोहीम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ई-दुचाकींत बदल करणाऱ्याविरुद्ध मोहीम
ई-दुचाकींत बदल करणाऱ्याविरुद्ध मोहीम

ई-दुचाकींत बदल करणाऱ्याविरुद्ध मोहीम

sakal_logo
By

पुणे, ता. २४ ः मान्यताप्राप्त संस्थेने दिलेल्या प्रमाणपत्राशिवाय ई-दुचाकींची निर्मिती करणारे वाहन उत्पादक, मान्यता असलेल्या विशिष्ट क्षमतेच्या ई-दुचाकींमध्ये अनधिकृत बदल करून ई-दुचाकीनिर्मिती करणारे वाहन उत्पादक तसेच विक्री करणारे वितरक यांच्याविरुद्ध पुणे जिल्ह्यात विशेष तपासणी मोहीम राबवण्यात येणार असल्याचे प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) कळविले आहे.

राज्य सरकारने पर्यावरणपूरक धोरण राबविण्याच्या अनुषंगाने महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन धोरण २०२१ अंतर्गत ई-बाईक्स व ई-वाहने यांना मोटार वाहन करातून धोरण कालावधीसाठी १०० टक्के सूट दिली आहे. केंद्रीय मोटार वाहन नियम १९८९ मधील तरतुदीनुसार २५० वॅटपेक्षा कमी क्षमता असलेल्या तसेच वेगमर्यादा ताशी २५ किलामीटरपेक्षा कमी आहे, अशा ई-दुचाकींना नोंदणीतून सूट दिली आहे.
वाहन उत्पादन करणाऱ्या उत्पादकास वाहन विक्री करण्यापूर्वी त्या वाहन प्रकाराची चाचणी ही केंद्रीय मोटार वाहन नियम १९८९ च्या नियमानुसार विहित केल्याप्रमाणे मान्यताप्राप्त एआएएल, आयसीएटी, सीआयआरटी इत्यादी संस्थांकडून प्रमाणपत्र घेणे बंधनकारक आहे. अशा प्रमाणपत्राच्या आधारे परिवहन आयुक्त कार्यालय अशा वाहनांना नोंदणीतून सूट देते. परंतु, काही वाहन उत्पादक मान्यताप्राप्त संस्थेने दिलेल्या प्रमाणपत्राशिवाय ई-दुचाकींची निर्मिती करत असल्याचे आढळून येत आहे.
ज्या ई-दुचाकींना उत्पादनाची मान्यता मिळाली आहे, अशा वाहनांमध्ये बेकायदेशीर बदल करून वाहनांची बॅटरी क्षमता २५० वॅटपेक्षा जास्त किंवा वेगमर्यादा २५ किलोमीटरपेक्षा अधिक करत असल्याचे आढळून आले आहे. असे उत्पादक, विक्री करणारे वितरक व अशी वाहने वापरणारे ई- वाहनधारकांविरुद्ध केंद्रीय मोटार वाहन नियम १९८९ तसेच भारतीय दंड संहितेअंतर्गत पोलिस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करण्याच्या सूचना प्रादेशिक व उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांना दिल्या आहेत.

मानकांप्रमाणे वाहन असल्याची खातरजमा करा
बेकायदेशीररीत्या बदल केलेल्या वाहनांची विक्री केल्यास रस्ता सुरक्षेस गंभीर धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. तसेच ई-वाहनांना आग लागून अपघात होत असल्याच्या घटना वारंवार निदर्शनास आलेल्या आहेत. नागरिकांनी वाहन खरेदीपूर्वी प्राधिकृत संस्थेने मान्यता दिलेल्या मानकांप्रमाणे वाहन असल्याची खातरजमा करावी. संबंधित वाहन वितरक व उत्पादकांकडे मान्यताप्राप्त संस्थेचे
प्रमाणपत्र व परिवहन आयुक्त कार्यालय यांनी जारी केलेल्या परवानगीची प्रत असल्याची खातरजमा करावी. वाहन उत्पादक, वितरक व नागरीकांनी अशा वाहनांमध्ये अनधिकृत बदल करू नयेत व जर अशा वाहनांमध्ये बेकायदेशीर बदल केले असल्यास ते त्वरित पूर्ववत करावेत, असे आवाहन परिवहन विभागाने केले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22r05829 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top