गृहनिर्माण सोसायटी सभासदांच्या डीम्ड कन्व्हेयन्सबाबत प्रतिक्रिया | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Home Generation Society
गृहनिर्माण सोसायटी सभासदांच्या डीम्ड कन्व्हेयन्सबाबत प्रतिक्रिया

गृहनिर्माण सोसायटी सभासदांच्या डीम्ड कन्व्हेयन्सबाबत प्रतिक्रिया

पुणे - सहकार विभागाने संकेतस्थळावर गृहनिर्माण संस्थांच्या मानीव अभिहस्तांतरणाची (डीम्ड कन्व्हेयन्स) प्रक्रिया ऑनलाइन करावी. अर्जासोबत कमी कागदपत्रे असावीत. ही प्रक्रिया सुटसुटीत करावी, अन्यथा या उपक्रमावर वर्षानुवर्षे सुरू असलेले प्रयत्न निष्फळ ठरतील, अशा प्रतिक्रिया ‘सकाळ’च्या वाचकांनी व्यक्त केल्या आहेत.

तंटामुक्त सोसायटी अभियानाचा आज प्रारंभ

राज्य सरकारच्या तंटामुक्त सहकारी गृहनिर्माण संस्था अभियानाचा प्रारंभ पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या सभागृहात गुरुवारी (ता. २६) सकाळी १०.३० वाजता होणार आहे. याप्रसंगी सहकार विभाग, महाराष्ट्र राज्य गृहनिर्माण संस्था फेडरेशन व ‘सकाळ माध्यम समूहा’च्या वतीने तंटामुक्त गृहनिर्माण संस्था आणि डीम्ड कन्व्हेयन्स विषयावर चर्चासत्र होईल. गृहनिर्माण संस्थांच्या पदाधिकारी आणि सभासदांनी उपस्थित राहावे, असे आवाहन केले आहे.

‘प्रशिक्षणावर भर द्यावा’

गृहनिर्माण सोसायटीमध्ये आपसांत कुटुंबाप्रमाणे जिव्हाळा निर्माण व्हावा, यासाठी तंटामुक्त गृहनिर्माण संस्था अभियान हा स्तुत्य उपक्रम आहे. सहकार विभाग आणि गृहनिर्माण फेडरेशनने सोसायट्यांचे पदाधिकारी आणि सभासदांच्या प्रशिक्षणावर भर द्यावा. तसेच, पुरस्कार देताना सोसायटीमध्ये स्वच्छता, उद्यान संवर्धन, गांडूळ खत, सौरऊर्जा, रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प, डीम्ड कन्व्हेयन्स, वीज-पाण्याची काटकसर, रेकॉर्ड, मेंटेनन्स वसुली आणि सामाजिक उपक्रम राबविण्यात येतात का, याबाबत विचार व्हावा, असे पाषाण येथील वसंत माने म्हणाले.

मेंटेनन्स आकारणीबाबत मते

गृहनिर्माण सोसायटीमध्ये देखभाल शुल्क (मेंटेनन्स) हे सदनिकेच्या क्षेत्रफळानुसार असावे. सदनिकेनुसार पाणी, लिफ्टचा वापर यासह इतर सुविधा कमी-जास्त प्रमाणात वापरल्या जातात. त्यामुळे कमी सुविधा वापरत असलेल्या सभासदांवर अन्याय होत आहे.

- किसन नऱ्हे, अध्यक्ष, आयफेल सिटी सहकारी गृहनिर्माण संस्था, चाकण

सदनिकांच्या क्षेत्रफळानुसार देखभाल सेवा शुल्क आकारावे. अपार्टमेंट ॲक्टप्रमाणे सोसायटीमध्येही देखभाल खर्च क्षेत्रफळानुसार असावा. एकाला एक आणि दुसऱ्याला वेगळा न्याय का?

- नितीन महांगरे, रा. व्यंकटेश लेक लाइफ दत्तनगर, पुणे आणि राजेश नाईक, अंबिका सिद्धी सोसायटी, घाटकोपर आणि सुनील मस्के, व्हिजन एस फेज-१ ताथवडे

गृहनिर्माण सोसायटी अथवा अपार्टमेंट यांचे मेंटेनन्स सर्व सभासदांना समान असावे. सदनिकेचे क्षेत्रफळ जास्त किंवा कमी असले तरी सर्व सभासदांना सार्वजनिक सुविधा सर्वांना सारख्याच मिळतात. मग देखभाल खर्च कमी-जास्त कशासाठी?

- सचिंद्र नेमाडे, नवीन डी. पी. रोड, कोथरूड आणि सुनील देशमुख, शिवनगरी सोसायटी, कोथरूड

काही प्रातिनिधिक प्रतिक्रिया

सहकार विभागाने डीम्ड कन्व्हेयन्सच्या लिंकवरच अर्जासह आवश्यक नमुने उपलब्ध करून द्यावेत. त्यावरच ऑनलाइन प्रक्रिया पूर्ण करण्याची व्यवस्था असावी, जेणेकरून वकील अथवा मध्यस्थाची गरज उरणार नाही.

- लखमीचंद गुलाबानी, सायर पार्क, चैतन्यनगर, धनकवडी

आमच्या गृहनिर्माण सोसायटीचे डीम्ड कन्व्हेयन्स १२ वर्षांपासून प्रलंबित आहे. कमीत कमी कागदपत्रे जोडून गृहनिर्माण सोसायटीच्या सभासदांना दिलासा द्यावा.

- नरेंद्र कांबळे, एस. बी. सृष्टी गृहनिर्माण सोसायटी, टिंगरेनगर

काही महिन्यांनंतर बिल्डरच कन्व्हेयन्सवर हस्ताक्षर करीत असेल, तर ते डीम्ड कन्व्हेयन्स ठरू नये. कन्व्हेयन्ससाठी येणारा खर्च सोसायटीतील सभासदांवर लादू नये. कन्व्हेयन्स न करणाऱ्या बिल्डरवर मोफा कायद्यानुसार कारवाई करावी.

- गिरीश जोशी, चंद्रलोकनगरी गृहनिर्माण संस्था, डहाणूकर कॉलनी, कोथरूड

गृहनिर्माण संस्था स्थापन करतानाच कन्व्हेयन्स होणे गरजेचे आहे. याबाबत तत्काळ निर्णय मिळणे आवश्यक आहे.

- लक्ष्मण थोरात, समर्थ गृहनिर्माण संस्था, शिरूर

ज्या सहकारी गृहनिर्माण सोसायटी किंवा बिल्डरनी लीजवर जागा घेऊन सहकारी संस्था स्थापन केल्या आहेत, त्या संस्थांच्या डीम्ड कन्व्हेयन्सबाबत कायदा आहे का? अशा संस्थांच्या कन्व्हेयन्सबाबत माहिती मिळावी.

- आनंदराव शिंदे, श्रीनिवासनगर गृहनिर्माण सोसायटी, कोथरूड

Web Title: Todays Latest Marathi News Pne22r05985 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :pune
go to top