
मुलांचा ताबा आईऐवजी आजीकडे
पुणे, ता. २५ ः पतीच्या अनैसर्गिक मृत्यूमुळे सासू व सूनेमध्ये दुरावा निर्माण झाला. त्यानंतर मुलांच्या ताब्याविषयीचा वाद कौटुंबिक न्यायालयात दाखल झाला. मुलांच्या इच्छेनुसार तसेच त्यांचा कल्याणाचा आणि भविष्याचा विचार करता न्यायालयाने त्यांचा ताबा जन्मदात्या आईकडे न देता आजीकडे ठेवण्याचा आदेश कौटुंबिक न्यायालयाचे प्रमुख न्यायाधीश सुभाष काफरे यांनी दिला.
पतीच्या मृत्यूनंतर सासू-सुनेमध्ये मृत्यूबाबत आरोप-प्रत्यारोप झाले. त्यामुळे त्या दोघींमध्ये वाद झाले. या वादामुळे त्या सुनेने तिच्या तीन मुलांना सासूकडेच सोडून माहेरी गेली. कालांतराने सुनेने कौटुंबिक न्यायालयामध्ये मुलांचा ताबा मिळण्यासाठी दावा दाखल केला होता. दाव्यात सुनेचे असे म्हणणे होते की, ती छोटा व्यवसाय करून पैसा कमावते, त्यामुळे मुलांचा सांभाळ करण्यास समर्थ आहे. सासूच्या म्हणण्यानुसार, ती स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये नोकरी करते. तिने आजपर्यंत मुलांच्या शिक्षणाचा, पालनपोषणाचा व औषधोपचाराचा खर्च केलेला आहे. या सासू-सुनेचे म्हणणे ऐकल्यानंतर न्यायालयाने मोठ्या १५ वर्षांच्या मुलीची साक्ष नोंदविली. त्या साक्षीमध्ये तीने आजीकडे राहण्याची इच्छा व्यक्त केली. तसेच इतर दोन मुलांची समुपदेशकाने मुलाखत घेतली असता, त्या दोघांनीही आजीकडे राहायचे आहे, असे सांगितले.
न्यायालयाने मुलांच्या इच्छेचा विचार केला. तसेच आजीने मागील पाच वर्षांपासून त्यांच्या पालनपोषणाची संपूर्ण जबाबदारी घेतली होती. तसेच त्यांच्या शिक्षणाची ही योग्य काळजी घेतलेली होती. त्यामुळे मुलांच्या इच्छेनुसार आणि त्यांच्या कल्याणाचा आणि भविष्याचा व कल्याणाचा विचार करून न्यायालयाने तीनही मुलांचा ताबा आजीकडे ठेवण्याचा निर्णय दिला आहे. आई ही नैसर्गिक पालक आहे, परंतु मुलांच्या कल्याणाच्या दृष्टीने व त्यांच्या योग्य व निकोप वाढीसाठी त्यांना आजीकडे ठेवणे योग्य होईल, असा आदेश न्यायाधीश काफरे यांनी दिला. परंतु, त्याच सोबतच आईला भेटणे हा मुलांचा नैसर्गिक अधिकार आहे. म्हणून पंधरा दिवसांतून एकदा न्यायालयाच्या बाल संकुलामध्ये दोन तासांसाठी आईला मुलांना भेटता येणार आहे. तसेच उन्हाळी, हिवाळी व दिवाळीच्या सुट्टीमध्ये आईला मुले आपल्या घरी नेण्याची परवानगी देण्याचा आदेश देण्यात आला आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Pne22r06205 Txt Pune Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..