
विधवा प्रथेस मुठमाती देण्यात चाकणकरांचा पुढाकार : बोराटे
यवत, ता. २६ : ‘‘राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महिला आघाडीच्या नेत्या रूपाली चाकरणकर यांची विधवांच्या सन्मासाठी नेहमीच सकारात्मक भूमिका राहिलेली आहे. त्यांनी आपल्या (माहेरच्या) घरापासूनच ही प्रथा मोडीत काढण्यासाठी घेतलेला पुढाकार कौतुकास्पद आहे,’’ असे त्यांचे चुलते पोपट बोराटे यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.
दौंड तालुक्यातील नांदूर हे रूपाली चाकरणकर यांचे माहेर आहे. त्यांचे काका अण्णासाहेब बोराटे यांचे अल्पशा आजाराने नुकतेच निधन झाले. त्यांच्या अंत्यसंस्काराला आलेल्या चाकणकर यांनी विधवा प्रथे विरुद्धची आपली भूमिका माहेरील मंडळींना बोलून दाखवली. ‘मनिषा काकूंना आहेवाच्या लेण्यापासून वंचित करायचे नाही,’ या त्यांच्या भूमिकेला इतरांनीही साथ दिली. घरातील दुःखद प्रसंगीही चाकणकर यांनी विधवांना अपमानित करणाऱ्या अंधश्रद्धे विरुद्ध घेतलेल्या भूमिकेला इतरांनीही पुरोगामी मानसिकतेने साथ दिली. चाकणकर यांच्या पुढाकाराची पंचक्रोशीने वाहवा केली. मागील वर्षी त्यांनी त्यांनी विधवांच्या हळदीकुंकवासाठी घेतलेल्या पुढाकाराची आठवणही त्यांचे चुलते पोपटराव बोराटे यांनी सांगितली.
अध्यक्ष पदाला योग्य न्याय...
विधवा स्त्रियांना पती निधनाचे आधीच दुःख असते. त्यात त्यांच्या बांगड्या फोडून, मंगळसूत्र उतरवून, कुंकू पुसून त्यांना विद्रूप केले जाते. याची सल उर्वरित आयुष्यभर त्यांच्या मनात राहते. या प्रथेविरुद्ध आपल्या घरापासून सुरूवात करणाऱ्या रूपाली यांचा आम्हाला अभिमान वाटतो. त्यांना राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष बनवून त्या पदाला न्याय दिला आहे, अशी भावना बोराटे परिवाराने व्यक्त केली.
Web Title: Todays Latest Marathi News Pne22r06709 Txt Pune Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..