पोलिसांकडून डॉक्टरच घेतो लाच! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पोलिसांकडून डॉक्टरच घेतो लाच!
पोलिसांकडून डॉक्टरच घेतो लाच!

पोलिसांकडून डॉक्टरच घेतो लाच!

sakal_logo
By

पुणे, ता. २८ : एखाद्या घटनेनंतर अनुकूल पद्धतीने तपास व्हावा यासाठी पोलिसांकडून फिर्यादी किंवा आरोपी पक्षाकडे आर्थिक स्वरूपाची मागणी केली जाते हे आपण आतापर्यंत ऐकले असेल. पण पोलिसांनाच ‘कामाला न लावण्यासाठी’ म्हणून पैसे द्यावे लागतात असे जर तुम्हाला कोणी सांगितले तर कदाचित विश्वास बसणार नाही. पण हे घडतंय...आणि तेसुद्धा ससून रुग्णालयाच्या न्यायवैद्यक शास्त्र विभागाच्या प्रमुखांकडून. गेले अनेक दिवस चाललेल्या या गैरप्रकाराला वाचा फोडली आहे खुद्द एका पोलिसानेच... एक गोपनीय अहवालाद्वारे केलेल्या या तक्रारीमुळे ‘फॉरेन्सिक ट्रॅप’मध्ये अडकलेल्या पोलिसांची सुटका होणार की नाही हे आता येत्या काही दिवसातच स्पष्ट होईल.
पुणे शहरातील रस्त्यावर अचानक मृत्यू झालेल्या माणसाच्या मृत्यूचे कारण पोलिसांना समजणे शक्य नसते. त्यासाठी शवविच्छेदन करणाऱ्या डॉक्टरांचा अहवाल महत्त्वाचा ठरतो. मात्र, नेमक्या याच टप्प्यावर ससून रुग्णालयातील न्यायवैद्यक शास्त्र विभागाला (शवागाराला) भ्रष्टाचाराचा संसर्ग झाल्याचे निदान आले आहे. या विभागाचे प्रमुख डॉ. नरेश झंजाड हे पैशासाठी पोलिसांचे अडवणूक करत असल्याचे गोपनीय पत्र ‘सकाळ’ला मिळाले.

कसा होतो भ्रष्टाचार?
पोलिसांतर्फे मृतदेह शवविच्छेदनासाठी शवागारात आणला जातो. शवविच्छेदन अहवालाच्या आधारावर हा गुन्हा नेमका कसा नोंदवायचा हे निश्चित होते. शवविच्छेदनाच्या प्राथमिक अहवालात डोक्याला मार लागल्याचे नमूद केल्यास खुनाचा गुन्हा नोंदवावा लागतो. तसेच, नैसर्गिक मृत्यू म्हटल्यास पोलिस तपासाचा प्रश्न राहात नाही. या टप्प्यावर डोक्याला आतून जबरी मार लागल्याचे मृत्यूचे कारण डॉ. झंजाड यांच्याकडून तोंडी सांगण्यात येते. त्यामुळे पोलिसांना खूनाचा गुन्हा दाखल करणे आवश्यक ठरते. त्यानंतर पुढील पोलिस तपास सुरू होतो. मृत्यूचे जे तोंडी कारण सांगितले असते, ते लेखी स्वरूपात पोलिसांना मिळत नाही. त्यामुळे गुन्हा दाखल करता येत आहे. अशा वेळी मृत्यूचा अंतिम अहवाल मिळण्यासाठी डॉ. झंजाड यांच्याकडून पैशाची मागणी होत असल्याचे गोपनीय पत्रात म्हटले आहे.

गोपनीय पत्रात काय आहे?
पुण्यात २९ वर्षांच्या एका मुलाचा अकस्मात मृत्यू झाला. डोक्याला आतून मार लागल्याचे मृत्यू झाल्याची तोंडी माहिती माहिती पोलिसांना दिली. मृत्यू हे कारण असल्यास गुन्हा दाखल करायला उशीर होईल. त्यासाठी पोलिसांनी मृत तरुणाच्या नातेवाइकांकडे तपास केला. त्या आधारावर मृताची व्यसनाधिनता पुढे आली. व्यसन आणि घटनाक्रम याची माहिती पोलिसांनी डॉक्टरांना सांगितली. त्यानंतर हा मृत्यू नैसर्गिक झाला आहे, असा मृत्यूचा अंतिम अहवाल देण्यासाठी डॉ. झंजाड यांनी पाच आकड्यांमध्ये पैशाची मागणी केली. मात्र, पोलिसांनी अडचणींचा पाढा वाचल्याने अखेर चार आकड्यांवर तडजोड झाली. त्यामुळे तरुणाचा नैसर्गिक मृत्यू झाल्याचे शिक्कामोर्तब झाले.

मृत्यूचा अंतिम अहवाल देण्यासाठी ससून रुग्णालयाच्या शवगारातील डॉक्टर पैशाची मागणी करतात, अशी एक तक्रार आली आहे. याची गांभीर्याने दखल घेतली असून, योग्य ती कार्यवाही करण्यात येईल.
- अमिताभ गुप्ता, पोलिस आयुक्त, पुणे

ही तक्रार निराधार आहे. मी किंवा विभागातील कोणताही डॉक्टर, कर्मचारी पोलिसांकडे पैशाची मागणी करत नाही. मृत्यूचे अंतिम कारण वस्तुस्थितीच्या आधारावर दिले जाते. त्यामुळे पैशाची मागणी ही पूर्णतः खोटी तक्रार आहे. या बाबत कोणतीही चौकशी केल्यास सत्य समोर येईल.
- डॉ. नरेश झंजाड, विभाग प्रमुख, न्यायवैद्यकशास्त्र, बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय

Web Title: Todays Latest Marathi News Pne22r07094 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top